निसर्गापासून झालेली फारकत दूर करावी लागेल- प्रा. मॅक्सवेल लोपीस
निसर्गापासून झालेली फारकत दूर करावी लागेल- प्रा. मॅक्सवेल लोपीस
उदगीर (एल.पी.उगीले) : ‘हरवलेला माणूस जगवायचा आजचे आव्हान आहे, यासाठी पूर्वीच्या चांगल्या गोष्टी आपल्याला पुन्हा अमलात आणाव्या लागतील. निसर्गापासून माणसाची झालेली फारकत व स्वतःपासून झालेली फारकत, या दोन बाबी लक्षात घेऊन आता शब्दांचे शस्त्र हाती घेऊन भवताल घडवावा लागेल’ असे प्रतिपादन गांधीवादी विचारवंत प्रा. मॅक्सवेल लोपीस यांनी केले. माय मराठी चॅनल ,अरुणा प्रकाशन व निसर्ग मंडळ आयोजित पहिल्या राज्यस्तरीय गावगाडा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी हे मत मांडले. सीमावर्ती भागातील तादलापूर येथे आज आयोजित संमेलनाचे उद्घाटन अमूर्त संस्कृती संचितचे संशोधक डॉ. साहेब खंदारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मसापाचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, स्वागताध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ.अंजुम कादरी, श्यामाप्रसाद धनुरे, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार उपस्थित होते.
वाडा संस्कृतीला वाहिलेल्या या आगळ्यावेगळ्या पहिल्या साहित्य संमेलनास आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. “स्वराज्य म्हणजे सत्तेचा लाभ नव्हे ही गांधीजींनी मांडलेली भूमिका आज आपल्याला पुन्हा लक्षात घेतली पाहिजे, दरवर्षी तीनशे करोड झाडं जाळली जात असताना त्याचा विचार आम्ही करणार का नाही? असा प्रश्न प्रा. मॅक्सवेल यांनी यावेळी उपस्थित केला. नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात आपल्याला लढावे लागेल याची सुरुवात साहित्याने केली पाहिजे अशी अपेक्षा प्रा.लोपीस यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके यांनी गावगाड्यातील संस्कृतीचा आढावा घेत ग्रामसंस्कृती सर्वसमावेशक असल्याचे सांगितले.
