एनईपी २०२० मध्ये ‘फ्युचर रेडी’ मूल निर्माण करण्याची अद्भुत क्षमता – प्रा. शिवाप्पा पाटील
शाहूवाडी (प्रतिनिधी) : प्राचीन सिंधू संस्कृतीपासून आजतागायत भारताची बौद्धिक परंपरा वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे, ती नवोन्मेषात अग्रेसर राहिली आहे. विकसित राष्ट्र निर्माणासाठी शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा महत्त्वाचा असून जागतिक दर्जाचे कालसुसंगत आणि भविष्यवेधी शिक्षण ही काळाची गरज असून जागतिक स्वीकार्यता असणारे ‘फ्युचर रेडी’ मूल तयार करण्याची विलक्षण अद्भुत क्षमता २०२० च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असल्याचे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले. मलकापूर येथे आयोजित शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० दरम्यान सुलभक म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करताना अनेक उदाहरणे देत प्रा. शिवाप्पा पाटील पुढे म्हणाले की, शिक्षकांसमोरील प्रत्येक मूल हे भिन्न असते. ही व्यक्तिभिन्नता प्रत्येक शिक्षकाने समजून घेऊन त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची दखल घ्यावी. प्रत्येक मूल हे स्वगतीने आणि स्वमतीने शिकते, हेही शिक्षकांनी लक्षात घ्यावे. शिक्षकांनी बालकांच्या बोली भाषेचा आदर करावा. गृहपाठ मजेदार, मनोरंजक, आव्हान प्रदान करणारा आणि शाळेला बालकाच्या घराशी, निसर्गाशी जोडण्यास मदत करणारा असावा. प्रत्येक मुलाच्या शिक्षणात निसर्गाला फार मोठे स्थान आहे. विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे शोधून त्यांनासुधारण्यास वाव द्यावा. त्यांना चुकण्याची आणि शिकण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांना स्वतः शिकण्यासाठी प्रेरित केल्यास मुलांची शिकण्याची गती तिप्पट वाढते, असाही मानसशास्त्रीय दृष्टिकोन सुलभक शिवाप्पा पाटील यांनी मांडला. विद्यार्थी तेजस्वी असतात. ते चौकस व्हावेत, त्यांच्याकडे चिकित्सक विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनी अभिनव प्रयोग करावेत. वर्गात क्षमता आधारित अध्यापन करताना शिक्षकांनी कोणतीही अध्यापन पद्धती वापरली तरी चालेल मात्र विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकास करावा. घोकंपट्टीपेक्षा कौशल्य विकसनावर भर द्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या १०० टक्के क्षमतांचा ३६० अंशामध्ये १०० टक्के विकास होईल आणि त्यांची समग्र प्रगती घडवून आणता येईल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी शिक्षकांनी बहुमुखी प्रयत्नांचे तत्व अंगीरावे, असेही आवाहन प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले. राष्ट्राचे सर्वोत्तम भविष्य सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा देणारे आणि त्यांचे सक्षमीकरण करणारे हे प्रशिक्षण मलकापूर येथील श्रीमती शोभाताई कोरे महिला महाविद्यालयामध्ये १० फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत घेण्यात आले. प्रशिक्षणाला कोल्हापूर ‘डाएट’चे अधिव्याख्याता प्रा. चंद्रहास हिप्परकर, गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार, केंद्रप्रमुख शिवराम मावची, शिक्षणप्रेमी मंडळी तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणात तालुक्यातील ६ वी ते १२ वीच्या सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या तीन टप्प्यांत सहभाग घेतला. यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा अमाप उत्साह पाहयला मिळाला.
