श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे “पंख हलवणारा पोपट” उपक्रमाने दिला पक्षीसंवर्धनाचा संदेश
उदगीर (एल.पी.उगीले) :उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे अनेक पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरणाचे हे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे “पंख हलवणारा पोपट” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रंगीत कागद, दोरा, डिंक वापरून आकर्षक पंख हलवणारा पोपट तयार केला आहे. तसेच अंगणात पक्षांना पाणी, धान्य शाळेच्या परिसरात तसेच घराजवळ ठेवण्याचा संकल्प केला. केवळ पाणीपात्र ठेवणे एवढेच नव्हे, तर पर्यावरण संवर्धन आणि पक्षी संरक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे यासाठी हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला.कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी पक्षीसंवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य लेखन, पशु पक्षी विशेष माहिती असे विविध उपक्रम शाळेत राबविले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली रंगीत चित्रे आणि आकर्षक घोषवाक्ये पर्यावरण जागृतीचा प्रभावी संदेश देणारी ठरली.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही उपस्थित होते. यांनी सांगितले की, “पक्ष्यांचे अस्तित्व पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर छोटे बदल करूनही आपण त्यांना मदत करू शकतो. जसे की, पाण्याची भांडी ठेवणे, फुलझाडे व वृक्ष लागवड करणे, तसेच कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणे.” शाळेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व संवेदनशीलता निर्माण करण्याचा हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देवक्तते पी. बी. यांनी केले. आभार कासले जि. एच. यांनी मानले.
