अभ्यासात सातत्य ठेवल्यानंतर यश प्राप्त होते-प्रणिता होळसंबरे
उदगीर (एल.पी.उगीले) : स्पर्धा परीक्षेला सामोरे जायचे असेल तर सुरुवातीपासून वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे. कठीण मेहनत केली पाहिजे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच यश प्राप्त होईल, असे उद्गार प्रणिती तुकाराम होळसंबरे यांनी काढले. त्यांनी राज्यसेवा परीक्षा 2023 मध्ये राज्यातून मुलीमध्ये 19 वा तर खुल्या प्रवर्गातून चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने विशेष व्याख्यान व सत्काराचे आयोजन केलेले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे, स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉ.व्ही.डी. गायकवाड, आयक्यूएसी चे समन्वयक डॉ.विष्णू पवार यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना होळसंबरे म्हणाल्या, बारावीनंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे वळले पाहिजे. नियमित वर्तमानपत्राचे वाचन करावे. अनेक परीक्षा देत राहाव्यात, तेव्हाच आपल्याला यश मिळते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले, आमचे महाविद्यालय स्पर्धा परीक्षा केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने चालवते. होळसंबरे यांची वर्ग एक पदी निवड झाली ही महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समन्वयक डॉ. व्ही.डी. गायकवाड यांनी केले, तर आभार डॉ.विष्णू पवार यांनी मानले.
