अहमदपुरात जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिला मेळावा संपन्न
अहमदपुरात जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिला मेळावा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) शहरातील पार्वती मंगल कार्यालयात मंगळवार दि. ४ रोजी उपविभागीय कार्यालय अहमदपूर व तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली एकल महिला मेळावा घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा नागरगोजे, सहाय्यक अभियंता रचना पवार, पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, उप अधीक्षक भूमी अभिलेख वैशाली गवई, शोभा घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे म्हणाल्या एकल महिलासाठी प्रशासन सज्ज असून एकल महिलासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ संबंधीतांनी घ्यावा, यासाठी प्रशासनातील अधिकारी तुम्हाला पुरेपूर मदत करतील. यात कोणतीही अडचण आली तर महसूल विभागाच्या प्रमुखाची संपर्क करावा, खरे तर हा मेळावा आयोजित करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन शक्य तेवढ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ मिळावा हा आहे.
पुढे बोलताना म्हणाल्या की एकल महिला या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतः करीत असल्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीने मिळणाऱ्या विविध योजना सहजतेने उपलब्ध व्हाव्यात अशी प्रशासनाची भूमिका आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले होते. यात तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचायत समिती, आरोग्य विभाग, नगरपरिषद, कृषी विभागासह इतर विभागाचा समावेश होता. यावेळी प्राचार्य रेखा तरडे, अनुराधा नळेगावकर, वर्षा माळी, प्रणिता बेंबळे, पुष्पा तेलंग आदींची उपस्थिती होती.
