फुलं सृष्टी व मानवी जीवनाचे नैसर्गिक सौंदर्य खुलवतात – प्राचार्य द.मा. माने

0
फुलं सृष्टी व मानवी जीवनाचे नैसर्गिक सौंदर्य खुलवतात - प्राचार्य द.मा. माने

फुलं सृष्टी व मानवी जीवनाचे नैसर्गिक सौंदर्य खुलवतात - प्राचार्य द.मा. माने

महात्मा फुले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष ‘फुले -२०२५’ निमित्ताने फुलांच्या प्रदर्शनाचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचा अभिनव उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध प्रकारची फुले मानवी जीवनात महत्त्वाची असतात. जीवनाच्या विविध वळणावर तसेच सुखदुःखाच्या प्रसंगात फुलांचे विशेष महत्त्व असते. फुलं सृष्टीचे व मानवी जीवनाचे नैसर्गिक सौंदर्य खुलवतात, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक माजी प्राचार्य द.मा. माने यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आय. क्यू. ए. सी. अंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘फुले प्रदर्शन – २५’ या कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ललित लेखक तथा समीक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी किसानपीठावर माजी प्राचार्य द. मा. माने, उद्योजक तथा प्रसिद्ध कवी महेंद्र खंडागळे, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. डी एन. माने, डॉ. सचिन गर्जे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सावित्रीबाई फुले, कुसुमाग्रज यांना स्मृतिदिनानिमित्त तसेच कवी मंगेश पाडगावकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पुढे बोलतांना माजी प्राचार्य द.मा. माने म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. निसर्गाकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती असून, त्यातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतात. त्या संधीचे सोनं करण्याचं काम युवा पिढीने करणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने आज महात्मा फुले महाविद्यालयाचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘फुले – २५’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध फुलांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून शिक्षणातून व्यवसायाच्या संधी कशा निर्माण केल्या जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण दिले आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रसिद्ध कवी तथा उद्योजक महेंद्र खंडागळे यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करत असताना स्पर्धेच्या युगात यशस्वी जीवन जगण्यासाठी विविध व्यवसाय तथा नोकरी मिळविण्या संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी आपल्या काव्यमय शैलीतून फुले प्रदर्शना संदर्भात मार्गदर्शन करताना विविध फुलांचे महत्त्व विशद केले. याबरोबरच भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने व डॉ. सचिन गर्जे यांनी विविध फुलांचे आरोग्याच्या, व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी फुलं मनातील प्रेमभाव आविष्कृत करण्याचे माध्यम फुले असतात. त्यांच्यातील रंग, गंध, स्पर्श संवेदनांची माणसाला भुरळ घालते. एवढेच नाही तर फुलांमध्ये परोपकाराचे गुण असतात आणि फुले हे निसर्गाचे मुख्य लावण्य असतात. त्या मुळेच निसर्गाचे सौंदर्य बहरते आणि बीजोत्पादनाचा संदेशही फुले देतात. फुलांनी आपल्या मानवी संस्कृतीचे अनादी काळापासून जतन केले आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘नॅक’ समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले व सूत्रसंचालन ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी तर आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. या कार्यक्रमात ३१ प्रजातींच्या विविध रंग, विविध गंध, स्पर्श संवेदना असलेल्या फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी अहमदपूर परिसरातील नागरिक तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या ‘फुले -२५’ प्रदर्शनात एकूण ३५ प्रजातींची फुलं ठेवण्यात आली होती. त्यामध्ये –
कृष्णकमळ, कुंदा, मोगरा, जास्वंद, पळस, रूचकी, लाल सदाफुली, पांढरी सदाफुली, धोतरा फुल, शेवगा फुल, टिकुमा, सूर्यफूल, अबोली, लाल झेंडू, बिजली, गलांडा, जांभळी शेवंती, लाल गुलाब, पिंक गुलाब, स्वस्तिक, विलायती, कुरडू, बेशरमांचे फुल, कन्हेरी, पांढरा चाफा, लाल चाफा, एप्रिल फुल, लीली, जरबेरा, पांढरा, बोगनवेलींच्या तांबड्या, केशरी आणि पिंक रंगाची फुलं या सह इतर अनेक लक्षवेधी अशा फुलांचा समावेश प्रदर्शनात होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!