स्त्रियांनी स्वतःच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी – प्रा. ओजदा पोळ
स्त्रियांनी स्वतःच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी - प्रा. ओजदा पोळ
अहमदपूर (गोविंद काळे) : वेदकाळापासून भारतीय संस्कृतीत स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आहे. गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी अशा अनेक स्त्रियांनी इतिहास घडवला आहे. मात्र आधुनिक काळातील स्त्री घरकुटुंब आणि नोकरी व्यवसायात गुरफटून गेल्यामुळे तिला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, स्त्रियांनी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही कळजी घ्यावी असे आवाहन पुणे येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डाॅ. ओजदा पोळ यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर आणि ग्लोबल संस्कृत फोरम, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय वेबिनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालय, मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी, दिल्ली येथील संस्कृत फोरमचे सचिव डॉ. राजेश मिश्रा, महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. पोळ म्हणाल्या, की स्त्रियांना आधुनिक काळात स्वातंत्र्य मिळाले खरे; मात्र त्यांची कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. या सर्व जबाबदाऱ्या निभावताना स्त्रियांची दमछाक होत असून, या धावपळीतून सुद्धा त्यांनी स्वतःसाठी वेळ राखून ठेवावा आणि जीवनाचा मनसोक्त आनंद घ्यावा असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आजच्या काळात स्त्रिया मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. समाजाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्याबरोबरच त्या अन्नपूर्णा म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांच्यामुळे जग जगते. त्या जगाची काळजी घेतात, मात्र स्वतःच्या आरोग्याची लापरवाही करतात. खऱ्या अर्थाने सक्षम भारतासाठी स्त्रियांनी सक्षम होणे आवश्यक असून, योग्य आहार, विहार आणि योगाचे धडे घेऊन स्त्रियांनी आरोग्यदायी जीवन जगावे असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सीमा उप्पलवार यांनी केले. सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले. संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर उप प्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये देशाच्या विविध भागातील अनेक अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
