सावधान…! आता नवीन कायद्यानुसार शिक्षा दंडयुक्त नव्हे, तर न्याययुक्त झालीय – सपोनि आनंद श्रीमंगले
सावधान...! आता नवीन कायद्यानुसार शिक्षा दंडयुक्त नव्हे, तर न्याययुक्त झालीय - सपोनि आनंद श्रीमंगले
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात नवीन कायदेविषयक कार्यशाळेत शासकीय वकील ॲड. एन. ए. भांगे व सपोनि श्रीमंगले यांचे मार्गदर्शन
अहमदपूर (गोविंद काळे) : काळानुरूप बदल करण्यात आलेल्या नवीन कायद्यानुसार दंडयुक्त शिक्षा आता न्यायुक्त झाली असल्याचे नमूद करून बदलत्या कायद्याची व त्याच्या परिणामांची सविस्तर माहिती लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक, अहमदपूर पोलीस ठाण्याच्या व महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त व आयक्युएसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत अहमदपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद एन.श्रीमंगले व अॅड. भांगे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. एन. ए. भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद श्रीमंगल, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चौधरी, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची उपस्थिती होती.
यावेळी जुलै २०२३ पासून लागू झालेल्या नवीन भारतीय न्याय संहितेबद्दल ज्येष्ठ सरकारी वकील एन.ए.भांगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. श्रीमंगले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरेही दिली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्था ही जगात सर्वश्रेष्ठ असून, नवीन कायदे हे सर्वांच्या हिताचे आहेत. तेव्हा सर्वांनी कायद्याने वागून समाजात आदर्श निर्माण करावा, तसेच कायद्याचा सन्मान राखावा असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन ह. भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले तर डॉ. प्रशांत बिरादार यांनी आभार मानले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
