अहमदपूर न प प्रशासनाचे दुर्लक्ष… कराड नगरात नळ कनेक्शन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर!
अहमदपूर न प प्रशासनाचे दुर्लक्ष… कराड नगरात नळ कनेक्शन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर!
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील लातूर- नांदेड रोड लगत असलेल्या कराड नगरमध्ये मागील अनेक दिवसापासून सार्वजनिक नळाचे कनेक्शन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर साचत आहे. यासंदर्भात स्थानिकांनी नगरपरिषद प्रशासनास कळवून देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांतून प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे.
लातूर- नांदेड रोड लगत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर कराड नगर मध्ये बरेच दिवसापासून सार्वजनिक नळाचे कनेक्शन फुटून प्रत्येक वेळेस पाणी सोडल्यानंतर हजारो लिटर पाणी रस्त्यावर साचून उताराकडे वाहत आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे डासांच्या उत्पत्तीत वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्यात धोका उद्भवू शकतो. तसेच घाणीचे साम्राज्य वाढून दुर्गंधी दरवळत आहे. कॉलनीतील स्थानिक नागरिकांनी सदर बाब नगरपरिषद प्रशासनाकडे कळवून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिकांत नाराजी दिसून येत आहे. तरी मुख्याधिकारी यांनी कार्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन भर उन्हाळ्यात, रस्त्यावर पाणी साचून वाहत असणाऱ्या हजारो इतर पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कराड नगर मधील नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे पाणी जपून वापरा, पाणी वाचवा, अशा प्रकारच्या जाहिरातीतून पाण्याचे महत्व, भूमिका विशद केली जाते. तर दुसरीकडे अशी अवस्था… नगरपरिषदेचे दुटप्पी धोरण, नागरिकांची होणारी हेळसांड आदी समस्यांमुळे स्थानिक नागरिकांकडून असंतोष निर्माण होत असल्याचे बोलले जाते.
