आपलं शरीर रासायनिक खतांची शेती झाली आहे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
आपलं शरीर रासायनिक खतांची शेती झाली आहे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
कृषी विभागाच्या सहकार्याने महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली सेंद्रिय कृषी आणि आरोग्य या विषयावर अहमदपूर तालुक्यातील चोबळीत कार्यशाळा संपन्न.
अहमदपूर (गोविंद काळे) : उत्पन्नाच्या लालसेतून शेतात अतिरेकी रासायनिक वापर करून व तेच खाऊन आपल्या शरीराची आपण शेती केली आहे. वरवर आजारी नाहीत असे आपल्याला वाटत असले तरी आतील रासायनिक वापरामुळे काही गंभीर आजार हळूहळू डोकं वर काढलेले असतात. नंतर ते जेव्हा जास्त वाढतात तेव्हा कुठे आपण दवाखान्यात जातो. पण, तो पर्यंत वेळ गेलेली असते. ती वेळ नये म्हणून आपल्या आरोग्याची तपासणी करून आयुर्वेदिक औषधींनी आपलं आरोग्य जोपासने काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
ते अहमदपूर तालुक्यातील मौजे चोबळी येथे प्रयोगशील शेतकरी संतोष पाटील यांच्या शेतात दि. १७ मार्च २०२५ सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या कृषी कार्यशाळेत बोलत होते. या वेळी कृषी पर्यवेक्षक पी. जी. देशमुख, कृषी सहाय्यक मंचक परतवाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आपण आजारी पडत नाहीत आपल्याला कसलाही शारीरिक त्रास नाही म्हणजे आपण निरोगी आहोत असा अनेकांचा गैरसमज असतो. पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो.खानपान वेळेत होत नाही.शिवाय दगदग, कामाचा ताण-तणाव, मुलांचे शिक्षण, विवाह यासह अनेक प्रश्न आपलं आतलं आरोग्य हळूहळू पोखरतात. रासायनिक पद्धतीने केलेल्या शेतीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात त्यातून केस गळती, त्वचारोग, शुगर, रक्तदाब, थॉयराईड यासारखे विविध आजार उद्भवतात असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक पी. जी. देशमुख म्हणाले की, आज शेतीतील उत्पन्न हे जास्तीचे निघावे म्हणून रासायनिक खतांचा अतिरेकी वापर होत आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे आपलं शरीर म्हणजे जणू काही दुसरी रासायनिक शेतीच झाली आहे. आपण शेतीपेक्षाही जास्त रासायनिक खतं भाजीपाला, फळं, दूध,दाळी वा इतर धान्यांच्या माध्यमातून शरीराला पुरवठा करून शरीराची दुसरी ‘शेती’ बनवली आहे. या शरीराचे मालक आपणच आहोत म्हणून त्याची काळजी घेणे, वेळे आधीच शरीराची तपासणी करून आपल्याला कोणताही आजार होणार नाही. हे जीवन पुन्हा नाही. म्हणून आजार होण्यापूर्वीच आरोग्याची काळजी घेत दीर्घायुषी बनावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच याप्रसंगी कृषी सहाय्यक मंचक परतवाघ म्हणाले की, आपलं शरीर ही आपली मालमत्ता आहे.म्हणून आपण तिचं रक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण निरोगी राहणं आवश्यक आहे. असं असेल तरच आपलं शरीर आपल्याला साथ देतं. आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आपण कोणताही आजारच होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे असे ही ते म्हणाले.
याकार्यशाळेचे प्रास्ताविक प्रयोगशील शेतकरी संतोष पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले व प्रो.डॉ. अनिल मुंढे यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. बी.के . मोरे, डॉ. सतीश ससाणे, प्रशांत डोंगळीकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
