आई- वडिलांच्या सेवेसारखे श्रेष्ठ कर्तव्य दुसरे नाही – माजी सभापती अयोध्याताई केंद्रे
आई- वडिलांच्या सेवेसारखे श्रेष्ठ कर्तव्य दुसरे नाही - माजी सभापती अयोध्याताई केंद्रे
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या ‘मातोश्रीं’ सीताबाई ससाणे प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ‘मातृत्वाचा’ गौरव करण्यात आला.
अहमदपूर (गोविंद काळे) : भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा केली. त्याची सेवा पाहण्यासाठी साक्षात विठ्ठलाला सुद्धा पंढरपूरला यावे लागले. जो आई-वडिलांची सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ असतो. देवदेव न करता प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करावी. आई-वडिलांच्या सेवेसारखे श्रेष्ठ कर्तव्य दुसरे कोणतेच नाही, असे प्रतिपादन अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अयोध्या ताई केंद्रे यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि. २० मार्च २०२५ रोजी कालकथित सीताबाई गंगाराम ससाणे प्रतिष्ठान आणि समाजशास्त्र विभाग, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मातृगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अयोध्या ताई केंद्रे बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर किसान पीठावर माजी पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे, सुरेखाताई केंद्रे, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, संयोजक डॉ. सतीश ससाणे, सीताबाई गंगाराम ससाणे प्रतिष्ठानचे सचिव आदित्य ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अयोध्याताई केंद्रे म्हणाल्या की, प्रत्येकाने आई-वडिलांची नीट सेवा केली तर वृद्धाश्रम काढण्याची गरजच उरणार नाही. वृद्धाश्रम ही संकल्पना म्हणजे भारतीय संस्कृतीला लागलेली कीड आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की जिथे आई असते, तिथे सर्व काही असते आणि जिथे आई नसते तिथे काहीच नसते. जी काळजी घेते ती आई असते. म्हणून मुलांनी आईच्या कष्टलेल्या हातांचा विचार केला पाहिजे. आई वरून शिव्या देणे बंद झाले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात लोचनाबाई मुंढे, सुंदराबाई कसाब, सुभद्राबाई चिलगर, गयाबाई गुट्टे, मीराताई कदम, अंजना मंडोळे, सुलुबाई गायकवाड, जयश्रीताई मोरे, गीताबाई मलगुरवार आदिमातांना शाल, साडीचोळी, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्याचे प्रास्ताविक संयोजक डॉ. सतीश ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले तर आभार प्रा. के. आर. कदम यांनी मानले. या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
