धावपळीच्या युगात रोगमुक्त आरोग्यासाठी आयुर्वेद हाच उत्तम पर्याय – मा. राज्यमंत्री बाळासाहेब जाधव
धावपळीच्या युगात रोगमुक्त आरोग्यासाठी आयुर्वेद हाच उत्तम पर्याय - मा. राज्यमंत्री बाळासाहेब जाधव
सलग ९ तास चाललेल्या या शिबीरात ६०० च्या वर रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून टॉयकॉन चॅरिटी फाऊंडेशन, पुणेच्या वतीने माफक दरात आयुर्वेदिक औषधी देण्यात आली.
अहमदपूर (गोविंद काळे) : धावपळीच्या जीवनात रासायनिक शेतीमुळे माती आणि पाण्याचे सत्व बिघडले असून, माणसाच्या शरीरामध्ये नकळत अनेक रोगांनी शिरकाव केलेला आहे. धकाधकीच्या काळात रोगमुक्तीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदशास्त्र हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील टायकॉन चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत महाआरोग्य तपासणी ‘ शिबिरात उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते, तर यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य डी. आर. झोडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी तसेच पुणे येथील टायकॉन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष योगेश तनपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.के. प्रताप, तज्ज्ञ आरोग्य सल्लागार प्रमोद नलावडे, बापुसाहेब काळे, तानाजी माने, कॅप्टन भास्कर आंब्रे, डॉ. प्रकाश चव्हाण, रोहित चोरघे, डॉ. अशोक मस्के, सौ. भाग्यश्री आर्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, मराठवाड्यात आरोग्यविषयक शिक्षणाची कमतरता असून, शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वस्तात आरोग्य शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी वेळोवेळी तपासण्या करून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून सामाजिक उत्तरदायित्व पार पडले. तसेच नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुकही यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले.
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक समीक्षक तथा महाआरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून महाविद्यालयाच्या वतीने या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या शिबिराचा लाभ अहमदपूर पंचक्रोशीतील जवळपास ६०० हून अधिक नागरिकांनी घेतला. हे शिबिर सलग नऊ तास चालले. तज्ज्ञ आरोग्य सल्लागार व डॉक्टरांनी न थकता रूग्णांची मोफत तपासणी केली. यावेळी सर्वच रूग्णांच्या चेह-यांवर समाधानाची चमक उमटत होती.
यावेळी टायकॉन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती तसेच चुंबकीय उपचार पद्धती,आरोग्यासाठी अल्काइन पाण्याचे महत्व या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष पाटील प्रा. प्रकाश गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचबरोबर डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. पांडुरंग चिलगर यांच्यासह आलेल्या रुग्णांचे नाव नोंदणी करण्याची जबाबदारी डॉ. डी. एन. माने, डॉ. प्रशांत बिरादार, प्रो. डॉ.नागराज मुळे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. किरण गुट्टे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. सचिन गर्जे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. यासाठी वामनराव मलकापूरे, शिवाजी चोपडे व चंद्रकांत शिंपी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, अहमदपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, लेखक, अभियंता, बॅंकेतील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सिंगच्या विद्यार्थिनी आदिंसह तालुक्यातील मुले वृद्ध व माता-भगिनी तसेच नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
