विद्यार्थ्यांनी शिस्त आणि जबाबदारीची जाणीव ठेवून आयुष्याचे नियोजन करावे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

0
विद्यार्थ्यांनी शिस्त आणि जबाबदारीची जाणीव ठेवून आयुष्याचे नियोजन करावे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

विद्यार्थ्यांनी शिस्त आणि जबाबदारीची जाणीव ठेवून आयुष्याचे नियोजन करावे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

बी. ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात प्राचार्य व प्राध्यापकांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अहमदपूर (गोविंद काळे) : कॉलेजचे दिवस हे आयुष्यात सोन्यासारखे असतात आणि ते एकदाच येत असतात. मात्र केवळ मौजमजा म्हणजे कॉलेज नसून, आयुष्याला शिस्त लावण्याचे ते महत्त्वाचे ठिकाण असते. शिस्तीमुळे जीवन यशस्वी होते. शिस्त आणि जबाबदारीच्या जाणिवेतून भविष्याचे नियोजन करणे हेच यशाचे पहिले गमक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.

येथील महात्मा फुले महाविद्यालयात बी.ए. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बी. ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ. सीमा उप्पलवार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी अंकिता जाधव, वैष्णवी मोरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सत्य, शिवं आणि सुंदरम् चा ध्यास घेतला पाहिजे. जीवन जगण्याची कला महाविद्यालयात प्राप्त होते. मात्र विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला पाहिजे, तसेच आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे मोल जाणले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सीमा उप्पलवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात पाहिलेली स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. आपल्या गुरूंचा आदर्श ठेवला पाहिजे आणि समाजासाठी जगण्याची शपथ घेतली पाहिजे. यावेळी बोलतांना डॉ. दुर्गादास चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी समाजाचा सक्षम नागरिक बनण्यासाठी जीवन मूल्यांचे शिक्षण महाविद्यालयातच घेऊन यशस्वी व्हावे, असा मूलमंत्र दिला. यावेळी बी.ए. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीची सुंदर प्रतिमा भेट दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वैष्णवी मोरे, आरती मंडले, भागवत भोसले, रोहन सावंत, दिव्या गुळवे, ऐश्वर्या बोडके, अमोल बनसोडे, अश्विनी गिरी, विद्युल्लता दोडे, विश्रांती पवार, वेदांत जोशी, वैष्णवी मंडले, काकनाजी सुरनर, रोहन कांबळे यांच्यासह प्रा. डॉ. सतीश ससाणे, डॉ. पांडुरंग चिलगर,ह‌.भ.प. प्रो.डॉ. अनिल महाराज मुंढे आणि डॉ. बी.के. मोरे यांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन बी .ए.प्रथम वर्षातील विद्यार्थीनी कु.शिवकन्या सुरनर व कु.आरती मंडले यांनी केले, तर आभार बी . ए.तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु.दिव्या गवळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!