“युवकांनो, समाजाप्रती आपल्या संवेदना जागृत ठेवा” ज्येष्ठ रंगकर्मी आविष्कार गोजमगुंडे
“युवकांनो, समाजाप्रती आपल्या संवेदना जागृत ठेवा” ज्येष्ठ रंगकर्मी आविष्कार गोजमगुंडे
लातूर (प्रतिनिधी) : दि. ३० मार्च समाजातील वेदना जाणून घेण्यासाठी युवकांनी आपल्या संवेदना नेहमी जागृत ठेवल्या पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ रंगकर्मी अविष्कार गोजमगुंडे यांनी केले. श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर द्वारा पदवी आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक राजेश्वर बुके, रंगकर्मी राजू गड्डीमे, प्राचार्य डॉ. संजय गवई, मुख्य समन्वयक डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षिका प्रा. वनिता पाटील, IQAC समन्वयक डॉ. आनंद शेवाळे, पदव्युत्तर समन्वयक डॉ. यशवंत वळवी, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. विजयकुमार सोनी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी अभिवादन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार आणि विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
पुढे बोलताना गोजमगुंडे म्हणाले की, आज समाजात माणुसकी जपणे अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशील तरुण पिढीच समाज परिवर्तन करू शकते. समाज माध्यमांचा माफक उपयोग करून वाचन, लेखन, संशोधन आणि विश्लेषण या कार्यात विद्यार्थी दशेत लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात भव्य दिव्य यश मिळवण्यासाठी संघर्षाला सामोरे जावेच लागते असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना रंगकर्मी राजू गड्डीमे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत विविध छंद जोपासून आपला व्यक्तिमत्व विकास साधला पाहिजे असे ते म्हणाले. प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानावर आणि श्री देशीकेंद्र महाराज यांच्या शिक्षणरूपी बहुमोल विचाराने सन १९७० पासून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातर्फे शैक्षणिक ज्ञानार्जनासोबत कला, विज्ञान, वाणिज्य, समाजकार्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये संस्था पदाधिकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनींच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी आपल्या भावी जीवनामध्ये उत्तुंग यश प्राप्त करीत आहे असे सांगून पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विनी रोडे, साक्षी घोडके, शिवाली मुकडे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य, बीसीए आणि पदव्युत्तर शाखा समन्वयक, विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व समितीचे सदस्य, विद्यार्थी परिषद व सांस्कृतिक विभागातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
