मान्सून काळातील आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

मान्सून काळातील आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर (प्रतिनिधी) : मान्सून काळात पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या आपत्तींची शक्यता असते. त्यामुळे अशा कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या मॉन्सूनपूर्व तयारी बैठकीत त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जाधव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोणतीही आपत्ती अचानक येते, त्यामुळे सर्व यंत्रणांनी अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे. लातूर पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या सिंचन तलाव, पाझर तलाव आदी प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाय योजना तातडीने कराव्यात. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत काय करावे किंवा काय करू नये?, याबाबत सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती अद्ययावत करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनीही यावेळी अनुषंगिक सूचना केल्या.
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व तहसील कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांना विविध साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व साहित्याची सद्यस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी यावेळी सांगितले.
महसूल विभाग, जलसंधारण व पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांनी मॉन्सूनपूर्व काळात करावयाच्या कार्यवाहीबाबत यावेळी सूचना दिल्या.
सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांनी केले. तसेच यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्रीराम वाघमारे, अफरोज शेख, प्रतीक देशमुख, लक्ष्मण सादले, भारत पुंडे हेही उपस्थित होते.