सक्सेस कोचिंग क्लासेस च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
सक्सेस कोचिंग क्लासेस च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगिले) : उदगीर येथील सक्सेस कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वासासोबतच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी करून घेऊन, जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला जातो. या क्लासेसच्या वतीने दिलेला मंत्र आणि घेतलेली मेहनत विचारात घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी अभिषेक हाळ्ळे याने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवले आहे.
एका रिक्षा चालकाचा मुलगा आणि अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना त्या परिस्थितीवर मात करून अमरावती येथील टाटा कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून त्याची नुकतीच निवड झाली आहे. हा त्याच्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या प्रयत्नाला आलेले यश आहे. असे समजून सक्सेस कोचिंग क्लासेस ने त्याच्या सत्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी पवन संतोषराव सूर्यवंशी, महालिंग मठपती, अनुराग बिरादार, राम संतोष सूर्यवंशी या शिक्षकांनी त्याचे गुणगौरव करून त्याला जीवनामध्ये हिम्मत दिली आहे.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवन सूर्यवंशी यांनी सांगितले की, आपण आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवून ती साकार करण्यासाठी कष्ट करण्याची आणि सातत्य ठेवण्याची तयारी दाखवा, म्हणजे आपले ध्येय आपण निश्चित गाठू शकतो. असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करून दिला. आपल्याच क्लासेस मधून शिक्षण घेतलेला, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि आठवी मध्ये असताना इंग्रजीचा शब्द न् शब्द पाठ करणारा अभिषेक आज जगाच्या पाठीवर कुठेही इंग्रजी भाषेमध्ये संभाषण करू शकतो, आणि जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा. परिस्थितीवर मात करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करून घ्यावी. असेही सांगितले. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन समीक्षा लोहकरे यांनी तर आभार प्रदर्शन अपूर्वा उगिले या दहावीतील विद्यार्थिनींनी केले.
