छत्रपती शिवाजी महाराज हे नियतीचे गुलाम नसुन नियतीचे स्वामी होते – प्रा.अजयदादा जाधवराव

छत्रपती शिवाजी महाराज हे नियतीचे गुलाम नसुन नियतीचे स्वामी होते - प्रा.अजयदादा जाधवराव
अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतत्वाला व इतिहासाला शहाजीराजे, जिजामाता, आजोळचे जाधव यांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी होती. म्हणूनच ते स्वराज्य स्थापनेचा मोठा विजय प्राप्त करू शकले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नियतीचे गुलाम नसुन नियतीचे स्वामी होते असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा.अजयदादा जाधवराव, सातारा यांनी केले.
ते अहमदपूर येथील मराठा सेवा संघ, अहमदपूर आयोजित १९ व्या जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेत ‘छत्रपती घराण्यांचा चार पिढ्यांचा संघर्ष’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्याख्याते प्रा. जाधवराव यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर किलबिल नॅशनल स्कूलचे संस्थाचालक ज्ञानोबा भोसले यांनी सुंदर आवाजात जिजाऊ वंदना सादर केली.
पुढे बोलतांना प्रा.जाधवराव म्हणाले की, जिजाऊची बुध्दीमत्ता,त्याग, प्रेम, धाडस व नेतृत्व या गुणांचा आदर्श आजच्या प्रत्येक स्त्री पुरुषांनी घेतला पाहीजे. मॉसाहेब जिजाऊ यांनी पुण्याचा कायापालट केला, छत्रपती शहाजीराजांनी बंगलोर शहर बसवले. छत्रपती घराण्यातील चार पिढयांचा संघर्ष सांगताना मॉसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या महान संघर्षाची गाथा आजच्या समाजाला माहीत होणे गरजेचे आहे. छत्रपती चा इतिहास इतिहासकारांनी हवा तसा लिहून आपल्यासमोर मांडलेला आहे परंतू पुरोगामी विचारसरणीच्या इतिहासकारामुळे छत्रपती घराण्याचा खरा संघर्ष आपल्याला समजू शकला.
शिवाजी महाराजाच्या कृतत्वाला पूर्वज आणी वंशज आहेत. त मॉसाहेब जिजाऊ व शहाजीराजे यांनी राज्यकारभाराचे उत्तम प्रशासनाचे धडे शिवरायांना बालपणापासुन दिल्याने स्वराज्याची खरी पायाभरणी शहाजीराजे यांनी केली. तसेच शिवाजी महाराजांचे भविष्याची लेखनी आपल्या राजमुद्रेमधून जगासमोर आणली. इंग्रज,डच, पोर्तूगीज यांची परकीय आकमणे व धर्मातरांची मोहीम नेस्तनाबुत करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्याचे प्रा.जाधवराव म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते तसेच शिवव्याख्याते शिवशंकर लांडगे, वक्त्यांचा परिचय बालाजी उच्चेकर तर आभार विलास आगलावे यांनी मानले.
यावेळी माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, तथा अहमदपूर मधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार मीडिया पत्रकार व मान्यवर उपस्थित होते . विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.