सर्वधर्म समभावाचा विचार म्हणजेच संविधान – सामाजिक कार्यकर्ते प्रा. जावेद पाशा, नागपूर

सर्वधर्म समभावाचा विचार म्हणजेच संविधान - सामाजिक कार्यकर्ते प्रा. जावेद पाशा, नागपूर
अहमदपूर (गोविंद काळे) : अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधणारे माळी समाजातील महात्मा फुले, स्वराज्याची पहिली सनद लिहिणारे मौलाना हैदर अली , आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज फातिमा शेख, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या अनेक जाती-धर्मातील महामानाने केलेला अविरत संघर्ष म्हणजे क्रांती. ही क्रांती अनेक जाती व धर्माच्या व्यक्तीनी केली तो समभावाचा विचार म्हणजे संविधान असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रा . जावेद पाशा, नागपूर यांनी केले. ते अहमदपूर येथील मराठा सेवा संघ, अहमदपूर आयोजित १९ व्या जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेत ‘फुले, शाहू, आंबेडकरांचा लोकशाहीचा लढा’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्याख्याते प्रा.जावेद पाशा यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. वक्त्यांचे स्वागत कवी राजेसाहेब कदम यांनी केले. त्यानंतर समर्थ लोहकरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली.
प्रा.जावेद पाशा बोलतांना पुढे म्हणाले की, आजच्या काळात हिंदू मुस्लीमांचे ध्रुवीकरण केले जात आहे आणि हे लोकशाही समोरील मोठे संकट आहे. आपले संविधान हे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा चालवणारे व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे संविधान आहे. इंग्लंडच्या आधुनिक व्यवस्थेत आलेल्या मंदीवर उपाय शोधण्यासाठी बनवलेल्या आयोगामध्ये भारतामधून फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. सावित्रीबाई फुले च्या कवितेचा उल्लेख करत प्रा. पाशा म्हणाले की, ‘नसते जर गफार मुन्शी बेग आणि लिजिट साहेब तर ज्योतिबा माझा महात्मा ज्योतिबा झाला नसता.’ या दोघांच्या पुढाकाराने महात्मा ज्योतीबा फुले यांचे खंडीत झालेले शिक्षण पूढे चालू झाल्याचे सांगीतले. या इतिहास जमा घटनेला प्रा.पाशा यांनी उजाळा दिला. तसेच कोणतेही विचार हे विचाराच्या स्तरावर राहीले तर परिवर्तन होत नाही. त्या विचार कृतीसाठी संसाधणाची गरज असते. ती संसाधणे आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय असतात. सर्व जाती-धर्माच्या अध:पतनाचे कारण मनुस्मृती ही होती त्याला लाथडून फुले शाहू आंबेडकरवादी विचारसरणी पुढे आली याच पुढे आलेल्या विचारसरणीतून समाजाचे परिवर्तन होत असल्याचे वक्ते प्रा. जावेद पाशा यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मारोती बुद्रुक पाटील, प्रास्ताविक आशोक चापटे, वक्त्यांचा परिचय सिध्दार्थ दापके तर आभार सोमनाथ ताडमे यांनी मानले. यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, तथा अहमदपूर मधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मीडिया पत्रकार व मान्यवर उपस्थित होते . विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.