गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी पद्धतीची भूमिका केंद्रस्थानी – डॉ. संजय हैबतपूरे

गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी पद्धतीची भूमिका केंद्रस्थानी – डॉ. संजय हैबतपूरे
उदगीर (एल.पी.उगीले) : संशोधनकर्त्यांनी वस्तुनिष्ठपणे संशोधन करण्यासाठी आणि अचूक निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी संशोधन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय, देवणीचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. संजय हैबतपूरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘रिसर्च मेथडोलॉजी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजीव सूर्यवंशी होते. डॉ. हैबतपूरे यांनी पीएच.डी. आणि एम.फिल. प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध संशोधन पद्धतींचा उल्लेख करताना योग्य पद्धतींचा वापर महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “संशोधन ही काळाची गरज असून, संशोधन कराल तरच पुढे जाता येईल,” असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. सूर्यवंशी यांनी “संशोधनामुळे समाजाची प्रगती होते, त्यामुळे संशोधन सातत्याने सुरू राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात भरीव योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा गायकवाड यांनी केले, तर आभार अमोल गहूकांबळे यांनी मानले. या वेळी प्रा. राजा मुदुडगे, डॉ. के. आर. गव्हाणे यांच्यासह एम.ए. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांना या कार्यक्रमात निरोप देण्यात आला.