तिवटग्याळ येथे शैक्षणिक “चावडी वाचन” आयोजित

तिवटग्याळ येथे शैक्षणिक "चावडी वाचन" आयोजित
उदगीर (एल.पी.उगीले) : शालेय परिपाठानंतर इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तेच्या विद्यार्थांची शिक्षक, पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत “चावडी वाचन” हा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी जाहीर केले. या चावडी वाचन शैक्षणिक उपक्रमांविषयी प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले की, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेली चावडी वाचन योजना आता राज्यभर राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.शाळेमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात. मात्र शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलाने किती ज्ञानार्जन केले याची पालकांनाही उत्सुकता असते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याबरोबरच त्यातून शिक्षकांच्याही गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी चावडी वाचन ही सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाचीच योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार गावच्या चावडीवर अथवा चौकात पालक, मुले, शिक्षक आणि सरकारी अधिकारी यांच्यासमोर विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. त्यामध्ये धडा अथवा कवितेचे वाचन, वृत्तपत्र वाचन, एखादा प्रयोग आदीचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण केले जाणार असून समोर उपस्थित नागरिक आणि अधिकारी त्याचे मूल्यमापन करणार आहेत. मात्र हा उपक्रम सहज आनंददायी अनौपचारिक वातावरणात घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांस सहभागी होण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितली. चावडी वाचनासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पंचायत स्तरावरील सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक- पालक आणि माता-पालक संघाचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांचा सहभाग असेल. चावडी वाचनाच्या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची निवड करुन विद्यार्थांचे शैक्षणिक गुणवत्ता प्रगतीबद्दल आढावा घेतला जाणार आहे, असे सांगितले. तदनंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ च्या परिसरात “चावडी वाचन” हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तेची विद्यार्थाची विषय निहाय मराठी,गणित व इंग्रजी विषयावर विविध प्रश्न, वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या घटकावर विद्यार्थांना सहभागी करुन प्रश्न विचारले, शैक्षणिक गुणवत्ताची तपासणी केली. सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहुन समाधान व्यक्त केले व विद्यार्थांचे कौतुक केले. शैक्षणिक चावडी वाचन हा उपक्रम राबविण्यात आल्या बद्दल प्रशासनाचे व शाळेतील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
हा शैक्षणिक चावडी वाचन उपक्रम अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय असलेल्याचे पालकांनी व शिक्षण प्रेमी नागरिकांनी बोलून दाखवले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. या चावडी वाचन उपक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी मानले.