शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य द्या- सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य द्या- सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
जल जीवन मिशनची कामे गुणवत्तापूर्ण करणे आवश्यक
शाळांची स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची दुरुस्ती, सौरऊर्जा जोडणी यांचे प्रस्ताव तयार करा
अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या. अहमदपूर प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित अहमदपूर उपविभागातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला सहकारमंत्र्यांचे स्वीय सहायक विजय पाटील, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संगमेश्वर बदनाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सांगळे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता आसिफ खैरादी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका ढोके, अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, चाकूरचे तहसीलदार नरसिंह जाधव, दिलीपराव देशमुख यांच्यासह विविध शासकीय विभागांचे जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
जल जीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी आणि ती कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना ना. पाटील यांनी दिल्या. प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल आणि प्रत्येक नळाला पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी. योजनेत वापरल्या जाणाऱ्या जलवाहिन्या आणि इतर साहित्याचा दर्जा तसेच कामाची गुणवत्ता राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. तसेच, सिंचन विहिरी, घरकुले आणि गोठ्यांसाठी निधीचे वितरण त्वरित होण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन सिंचन विहिरींच्या कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
अहमदपूर आणि चाकूर शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासंबंधीच्या कामांना प्राधान्य द्यावे. सध्याच्या उन्हाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात. अहमदपूर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश ना. पाटील यांनी दिले. सध्या पाझर तलाव आणि साठवण तलावांतील पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत या प्रकल्पांमधील जास्तीत जास्त गाळ उपसण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे आणि सिंचन प्रकल्पांचा पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.
अहमदपूर, चाकूर तालुक्यातील शाळांच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करावेत. तसेच आगामी शैक्षणिक वर्षातील मोफत पुस्तके, मोफत गणवेश वितरणाचे सूक्ष्म नियोजन करावे, असे ना. पाटील म्हणाले. पाणंद रस्त्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. किनगाव आणि चाकूर येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, सामाजिक वनीकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण रस्ते, वीज वितरण आणि विद्युत उपकेंद्र उभारणी आदी कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
प्रारंभी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अभ्यागत कक्षाचे ना. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.