खून प्रकरणी दोन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा.

लातूर (एल.पी. उगिले ) अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यामुळे तो काटा काढायच्या उद्देशाने केलेल्या खून प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, चाकूर जवळील लातूर रोड व चाकूर च्या मधील एका फर्निचरच्या दुकाना समोर दि.०६.०७.२०२० रोजी रात्रीच्या सुमारास प्रकरणातील मयत प्रभाकर गोविंदराव साळुंखे ह्याचा सदर प्रकरणातील आरोपी क्र.
१ धनराज सुधाकर आगलावे याने त्याच्यात व आरोपी क्र. ३ मयताची पत्नी या दोघांच्या अनैतिक संबंधात मयत अडथळा होत असल्याच्या कारणाने आरोपी क्र. २ राजू लक्ष्मण गायकवाड याच्या मदतीने टेस्टर व दगडाने डोक्यावर घाव घालून ठार मारले. सदर प्रकरणात फिर्यादी दिनेश गोविंदराव साळुंखे यांच्या जवाबावरून गुन्हा क्र. २३१/२०२० चाकूर पोलिस स्टेशन येथे तिन्ही आरोपी विरोधात भा. द. वि. च्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर प्रकरणातील तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व सध्याचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन येथिल तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड, तत्कालीन निरीक्षक जयवंत रामचंद्र चव्हाण यांनी केला. तपसाअंती लातूर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर प्रकरण लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ श्री आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात चालवण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण २० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने मयताचे नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी, नोडल अधिकारी, मयताला आरोपिसोबत शेवटचे पाहिलेले साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
सदरच्या प्रकरण पोलिसा कडून भरपूर परिस्थितीजन्य पुरावा हस्तगत करण्यात आला. न्यायालयाने सदर प्रकरणात पोलिसानी सादर केलेल्या पुराव्यातील सिसिटीव्ही फुटेज, साक्षीदारांची साक्ष, इतर शास्त्रोक्त व इतर परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून आरोपी क्र. १ धनराज सुधाकर आगलावे,२ राजू लक्ष्मण गायकवाड या दोन्ही आरोपीस मयत प्रभाकर गोविंदराव साळुंखे याच्या खून प्रकरणी भा. द. वि. च्या कलम ३०२ अन्वये दोषी धरून त्यांना जन्मठेपेची (आजन्म कारावास) तसेच १०००/- रुपये द्रव दंडाची शिक्षा
सुनावण्यात आली.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री. संतोष वसंतराव देशपांडे यांनी काम पाहिले. तसेच त्यांना सदर प्रकरणात सहायक सरकारी वकील एस एस रादंड, ट्रायल मॉनिटरिंग सेल चे पोलीस उपनिरीक्षक रोहण पाटील, पोलिस अंमलदार राचमाले (कोर्ट पैरवी) चाकूर पोलिस स्टेशन, समन्वयक व पैरवी अधिकारी सपो. उपनि आर.टि. राठोड, अॅड. एम. के. बिरीकर व दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.