आत्मकथनांत समाजाला दिशा देण्याची ताकददोन आत्मकथनांचे प्रकाशन – धनंजय गुडसूरकर
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : “आत्मकथन हे सार्वजनिक झाले की लेखकापुरते मर्यादित नसते, त्यातून निर्माण होणारी परिणामकारकता ही सामाजिक असते, ‘काजवा’ व ‘मायंबा ते मुंबई ‘या दोन्ही आत्मकथनात समाजाला दिशा देण्याची ताकद आहे “असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी केले. काजवा प्रकाशनच्या वतीने डॉ.शिवाजी घुंगरड यांच्या ‘मायंबा ते मुंबई ‘या आत्मकथनाचे,पोपट काळे यांच्या ‘काजवा’ च्या सहाव्या मराठी आवृत्तीचे तसेच काजवाचा चंद्रकांत पोकळे अनुवादित कन्नड अनुवाद ‘मिंचुहूळा’, डॉ छाया पाटील अनुवादित हिंदी अनुवाद ‘जुगनू ‘व प्रशांत तळणीकर अनुवादित इंग्रजी अनुवाद ‘ दी फायरफ्लाय’ या पुस्तकांचे प्रकाशन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी भाष्यकार म्हणून धनंजय गुडसूरकर बोलत होते.अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम होते. मंचावर उद्योजक भाऊसाहेब राजळे, अनुराधा अंकुशराव कदम , नाशिक विभागीय तंत्र शिक्षण विभाग सहसंचालक डॉ. गोरक्ष गर्जे, लेखक डॉ.शिवाजी घुंगरड, पोपट काळे उपस्थित होते.प्रारंभी जिजाऊ वंदना सादर करण्यात आली.’ माणूस मोठा झाला की त्याला गरिबीचा भूतकाळ नकोसा असतो, मोठेपणाच्या जाणिवेतून पूर्वीची गरीबी लपविणे हे प्रतिष्ठेचे समजले जाण्याच्या काळात वास्तव सांगण्याचे धारिष्ट्य या दोन्ही आत्मकथनातून आले आहे.” पूर्वीच्या अशिक्षित पिढीकडे असणारा विवेकवाद, सकारात्मक दृष्टिकोन, प्रतिकूलतेशी झुंजण्याचे सामर्थ्य या बाबी खऱ्या अर्थाने ठेव आहेत, या ठेवीचा वापर पुढील पिढ्यांपर्यंत पोचविण्यात लेखक यशस्वी झाल्याचे “मत गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. ” बिनशिकलेल्या पालकांनी आम्हाला शिकवले व मोठे केले, त्यांचा दृष्टिकोन विशाल होता त्या तुलनेत आम्ही शिकलेले पालक म्हणून काय करत आहोत?हा आजचा मुख्य प्रश्न आहे. सर्वहारा कुटुंबातील संघर्ष समाजासमोर येणे गरजेचे आहे. प्रामाणिक असणारी ही आत्मकथने त्या दृष्टीने दिशादर्शक आहेत असे मत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. “समाजामध्ये असणारा न्यूनगंड दूर करून विश्वास निर्माण करण्याचे काम होणे गरजेचे असून त्यासाठी समाजातील पुढे आलेल्या लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे” असे मत खेडेकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. ” शिक्षितांची मानसिकता तपासणे गरजेचे असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सावकार शिक्षित माणसेच असतील तर त्या शिक्षणाला काय अर्थ उरतो?”असा सवालही खेडेकर यांनी यावेळी उपस्थित केला. या दोन्ही पुस्तकांचे लेखक हे ‘अनसिन हिरो ‘ असल्याचे मत सहसंचालक डॉ.गोरक्ष गर्जे यांनी व्यक्त केले. लेखक पोपट काळे, शिवाजी घुंगरड,उद्योजक भाऊसाहेब राजळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. अंकुशराव कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीतून समोर येऊन आपल्या भूतकाळाला न विसरता त्यासाठी काम करणाऱ्या मंडळींचे कौतुक केले. पोपट श्रीराम काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक , भारत काळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुरेंद्र घुंगरड यांनी आभार मानले.’ब्रम्हगाव’ ते ग्लोबल. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव पासून पुण्याच्या शिक्षणाधिकारी पदापर्यंतचा पोपट काळे यांचा संघर्षमय प्रवास मांडणारे काजवा हे आत्मकथन आता इंग्रजीत भाषांतरित झाल्यामुळे खऱ्या अर्थाने ग्लोबल झाले आहे. या आत्मकथनाच्या मराठीत सहा आवृत्त्या, हिंदी, कानडी व इंग्रजीत झालेले भाषांतर ही बाब काळे यांच्या जडणघडणीचे व अक्षर प्रवासाचे कौतुकच असल्याचे गुडसूरकर यावेळी बोलताना म्हणाले.
