तिरुपती येथे सेवा करुन आलेल्या माऊली नगर च्या सेवेकऱ्यांचा महिलांतर्फे सत्कार

तिरुपती येथे सेवा करुन आलेल्या माऊली नगर च्या सेवेकऱ्यांचा महिलांतर्फे सत्कार
उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील निडेबन येथील माऊली नगर मध्ये तिरुपती येथे सेवा करुन आलेल्या सेवेकऱ्यांचा दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महिलांतर्फे सत्कार करण्यात आला. दि. २० ते २७ मे २०२५ या कालावधीत तिरुपती येथील बालाजी मंदिरात माऊली नगर मधील रहिवासी सेवेसाठी गेले होते. त्यात अमरदीप देशमुख, संतोष चामले, चंदू पाटील, बालाजी मुस्कावाड, उमाकांत नादरगे, विजयकुमार दापकेकर, कृष्णा गेंदेवाड, बालाजी पांचाळ, सुजित जाधव, मुकुंद तुपदाळे, महेश मेहत्रे, बालाजी मटवाड, गंगाधर पोगुलवाड, सतीश जगताप यांचा समावेश होता. या सर्वांनी या सात दिवसांत तिरुपती येथील मंदिरात निःस्वार्थी भावनेने सेवा बजावली. व उदगीर येथे सुखरूप पोहंचल्याबद्दल सर्वच सेवेकऱ्यांचा सत्कार महिलांतर्फे करण्यात आला.
यावेळी बालाजी मुस्कावाड यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले , तिरुपती येथे सेवा करुन आल्यामुळे सत्कार केला म्हणून सर्वप्रथम मी सर्वच महिलांचे आभार मानतो. तिरुपती बालाजी हे आंध्र प्रदेश राज्यातील तिरुमला पर्वतावर असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूचे रूप असलेल्या व्यंकटेश्वराला समर्पित आहे, आणि भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. तिरुपती बालाजी मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे हे मंदिर लाखो भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. कलियुगात मानवाचे दुःख दूर करण्यासाठी भगवान विष्णू व्यंकटेश्वर रूपात अवतरले, असे मानले जाते. तिरुपती बालाजी हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तिरुपती येथे दररोज मोठ्या प्रमाणात दान केले जाते. भारत देशातील अनेक राज्यांतून तिरुपती येथे दररोज हजारो भाविक भक्त दर्शनासाठी व सेवेसाठी येतात. पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात महिला सेवेकरी तिरुपती येथे येऊन सेवा करतात. भक्ती भाव ठेवून सेवेकरी तिरुपती येथे येऊन सेवा देतात. हाच भाव ठेवून उदगीर येथील माऊली नगर मधील रहिवासी सेवेसाठी गेले होते.