धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक; कर्करोगांचा धोका वाढतो
धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक; कर्करोगांचा धोका वाढतो
लातूर (प्रतिनिधी) : आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, धूम्रपान केल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. जसे की फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकार आणि विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो. धूम्रपान केल्याने शरीरातील अनेक अवयवांना नुकसान होते, अशी माहिती येथील गायत्री हॉस्पिटलचे संचालक श्वसन विकार व छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी दिली.
धूम्रपानाच्या दुष्परिणामाविषयी डॉ. भराटे म्हणाले, धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, अन्ननलिका, स्वादुपिंड आणि मूत्रपिंडाचा कर्करोग, हृदयविकार, स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्या होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, एम्फिसीमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) जुनाट दमा होऊ शकतो. धूम्रपान केल्याने पचनसंस्थेचे अल्सर होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान केल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.*
धूम्रपान केल्याने पुरुष आणि महिलांच्या प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. ऑस्टियोपोरोसिस आणि सांध्यांच्या समस्या वाढतात. मेंदूचा आकार बदलतो आणि विचार करण्याच्या कौशल्यांवर परिणाम होतो. त्वचेवर सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात. गर्भधारणेच्या समस्या वाढतात, जसे की बाळ लहान जन्माला येणे, गर्भपात आणि मुदतपूर्व प्रसूती.
धूम्रपान सोडल्यास अनेक फायदे मिळतात, जसे की, कर्करोग, हृदयविकार आणि इतर आजारांचा धोका कमी होतो. श्वसन प्रणाली सुधारते. शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. जीवनशैली सुधारते. प्रजनन क्षमता सुधारते. धूम्रपान टाळणे किंवा सोडणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असेही डॉ. रमेश भराटे म्हणाले.
