22 गोवंश कंटेनर मध्ये कोंबून कत्तलखान्याकडे निघाले !! वाढवणा पोलिसांनी रंगेहातच जनावरासह आरोपींना पकडले !!
वाढवणा पोलिसांनी रंगेहातच जनावरासह आरोपींना पकडले !!
उदगीर (ॲड. एल पी उगिले) : उदगीर परिसर हा महाराष्ट्राचा सीमा भागातील परिसर आहे. येथून हाकेच्या अंतरावर कर्नाटक आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील लोक या सीमा भागाचा फायदा घेत महाराष्ट्रात गुन्हे करायचे आणि कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये जाऊन त्या गुन्ह्यातील मुद्देमालाची विल्हेवाट लावायची, आणि लपण्यासाठी शेजारच्या राज्यात आसरा घ्यायचा. अशा पद्धतीच्या गुन्ह्यां करण्याच्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या चोरट्यांच्या बाबतीत पोलीस सतर्क झाले आहेत.
मात्र आता नवा ट्रेंड सुरू झाला आहे. केंद्र शासनाने गोवंश हत्या आणि जनावरांना क्रूरपणे वागणूक देणे याला आळा घालण्यासाठी कायदा केला आहे. त्या कायद्याची सरळ सरळ पायमल्ली करत महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा भागात अवैध पद्धतीने गोवंशाचे वाहतूक केली जात आहे. दुर्दैवाने काही ठिकाणी पोलीस प्रशासनाने पकडलेले जनावरे पुन्हा बाजारात विक्रीसाठी दिसून येत असल्याने, गोशाळा आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली जात असतानाच, उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलिसांनी आपल्या कर्तबगारीने तब्बल 22 गोवंश कत्तलीसाठी जात असल्याचे समजताच तातडीने कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
महाराष्ट्रातील बैल बाजारामध्ये हळी हंडरगुळी हे नाव उल्लेखनीय आहे. या ठिकाणाहून बैलांचा बाजार मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र दुर्दैवाने म्हातारी झालेली बैल, गाई सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण झाल्याने कित्येक शेतकरी मिळेल त्या किमतीमध्ये गोवंश विकतात. मोठ्या प्रमाणात अशा वृद्ध झालेल्या बैल आणि गाईंना कत्तल खाण्यासाठीच खाटीक प्रवृत्तीचे व्यापारी खरेदी करतात, आणि खरेदी केल्यानंतर परराज्यातील असेच व्यापारी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कत्तलखाण्यासाठी ती जनावरे पाठवून दिली जातात.

अशाच पद्धतीने दिनांक 31 मे 2025 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाढवणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सुकनी येथील सुलतान धाब्याच्या जवळ सिंघम म्हणून ओळखले जाणारे पोलीस जमादार संजय दळवे पाटील आणि त्यांचे सहकारी तुकाराम बळदे, शिवप्रताप रंगवाळ यांच्या पथकाने पाळत ठेवून एक विटकरी रंगाचे कंटेनर (क्रमांक के ए 38 ए 72 65) जुना वापरात असलेला तपासला असता त्या आठ फूट रुंद आणि 24 फूट लांब असलेल्या कंटेनरमध्ये तब्बल 22 गोवंशाची जनावरे अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने त्यांना हालचाली करता येणार नाही. अशा पद्धतीने कोंबल्याचे निदर्शनास आले. त्या बैलांना आखूड दोरीने बांधल्यामुळे हालचाल ही करता येत नाही, अशी अवस्था निर्माण झाली होती. गैरवाजवी कालावधीसाठी दाटीवाटीने आणि चारा पाण्याची कसलीही सोय न करता त्या जनावरांना कत्तलखाण्याकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने जात असल्याचे निदर्शनास आल्यावरून पोलीस जमादार संजय दळवे पाटील यांच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 154 /25 कलम 5 (अ), 5 (ब), 9 ,11 महाराष्ट्र पशुसंरक्षण सुधारणा अधिनियम 1976 सहकलम 11(1) (ड),(ई) प्राण्यास निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम सन 1960 सह कलम 66 (1), 1992 मोटार वाहन अधिनियम प्रमाणे आरोपी पुंडलिक सिताराम बिरादार (वय 56 वर्ष रा. हंचनाळ ता. देवणी), अनिल वेंकट भोई (वय 25 वर्षे रा. मलखेड तालुका हुमनाबाद जिल्हा गुलबर्गा) आणि नागेश शरणाप्पा भोई (वय 35 वर्षे रा. हळीखेड ता. हुमनाबाद जिल्हा गुलबर्गा) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यासंदर्भात वाढवणा पोलिसांच्या जांबाज कर्मचाऱ्यांनी कत्तलखान्याकडे जात असलेल्या 22 बैलांना मुक्त तर केलेच आहे, तसेच या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले वापरात असलेले कंटेनर अंदाजे किंमत सहा लाख रुपये आणि गोवंशाची किंमत असे एकूण 14 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाढवणा पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कारवाईबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ हे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
