अवैध खत विक्री करणाऱ्यांना कंपनी प्रतिनिधीसह वाहनचालकावर कारवाई, १३६ पोती अवैध रासायनिक खतासह वाहने जप्त

0
अवैध खत विक्री करणाऱ्यांना कंपनी प्रतिनिधीसह वाहनचालकावर कारवाई, १३६ पोती अवैध रासायनिक खतासह वाहने जप्त

अवैध खत विक्री करणाऱ्यांना कंपनी प्रतिनिधीसह वाहनचालकावर कारवाई, १३६ पोती अवैध रासायनिक खतासह वाहने जप्त

उदगीर (एल पी उगिले) : यंदा मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. त्यामुळे अवैध मार्गाने खत विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सीमे लगतच्या भागात असे अवैध प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत घरपोच देण्याच्या नावाखाली काही खत विक्रेते अवैध खतांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे लातूर जिल्हा परिषदेतील मोहीम अधिकारी कृषी मिलिंद बिडबाग यांच्यासह संबंधित कृषी विभागाच्या पथकाने निलंगा तालुक्यातील निटूर व खडक उमरगा शिवारात धाड टाकली असता विविध प्रकारच्या मात्रा असलेले खत, १ लिटर व १०० मिली लिक्विड असलेल्या रसायनचे ४८ नग आणि वाहतूक करणारी वाहने असा एकूण ११ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर संबंधित आरोपी विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, रासायनिक खते उत्पादन कंपनीच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकृत खत व रसायने विक्री करणाऱ्या परवानाधारक दुकानदारांना सदरील मालाची विक्री न करताच त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, निलंगा पंचायत समितीचे कृषी अधिकारी नाथराव रामभाऊ शिंदे यांना निलंगा तालुक्यातील निटूर व खडक उमरगा शिवारात अवैधरित्या रासायनिक खत विक्री वाहनाच्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लातूर जिल्हा परिषदेतील मोहीम अधिकारी कृषी मिलिंद बिडबाग यांना याबाबत माहिती दिली.
ही कारवाई विभागीय कृषी सह संचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर टी जाधव, लातूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर, वि.स.सं. कार्यालयाचे तंत्र अधिकारी प्रवीण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मोहीम अधिकारी कृषी मिलिंद बिडबाग, निलंगा तालुका कृषी अधिकारी एन.एन. कुटवाड, निलंगा पंचायत समितीचे कृषी सहाय्यक ए बी गोसावी यांच्या पथकाने निटुर व खडक उमरगा शिवारात धाड टाकली असता त्या ठिकाणी टाटा कंपनीचा ट्रक टेम्पो क्रमांक एमएच २४ जे ८०११ (किंमत ६ लाख रुपये), आयशर टेम्पो क्रमांक एमएच ०४ एफयु ८२३१ (किंमत ३ लाख रुपये) या वाहनांमध्ये सम्राट ऍग्रो इंडस्ट्रीज, गट क्रमांक ३१५/१, चिंचोली एमआयडीसी ५ वे क्रॉस इंडस्ट्रियल एरिया सोलापूर, इन्व्हाईस क्रमांक ००६ असे नाव असलेला रासायनिक खतांच्या ५० किलो वजनाच्या ४६ बॅगा (किंमत ४३ हजार ९३० रुपये), वरून बायोपोटॅश (डीपीएम) ४ बॅगा (किंमत ४ हजार ३२० रुपये), इंडोसील – ७० (इंडो सिलिकॉन ग्रॅन्यूल) – ३२ बॅगा (किंमत २८ हजार ८०० रुपये), सुरक्षा सइल कंडिशनर (भू सुधार पावडर) – ११ बॅगा (७ हजार ४८० रुपये), सोया तूर स्पेशल (बायोएक्स ट्रॅक अँड मायक्रो न्यूट्रिएंट लिक्विड) १ लिटरचे ३५ नग (किंमत ६१ हजार २५० रुपये), ८ जर्मीनेट (अन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट) १०० मिली १३ नग (किंमत ५ हजार ८५० रुपये) तसेच प्रोम – ४० बॅगा (सिल कंडिशनर/ भू सुधार पावडर) १३ बॅगा, ३ वरुण बायोपोटॅश (डीपीएम) १७ बॅगा अशी एकूण (किंमत १ लाख २६ हजार ४५० रुपये) असा एकूण ११ लाख ७८ हजार ८० रुपयांचा माल पंचा समक्ष पंचनामा करुन जप्त केला आहे. तसेच त्या खताचे नमुने विश्लेषणासाठी लाख सील मोहर बंद केला आहे. तालुका कृषी अधिकारी नाथराव रामभाऊ शिंदे यांना वरील माल प्रयोग शाळेत पाठविणे, संशयीत खत विक्रीस प्रतिबंध करणे, विक्री बंद आदेश देणे, जप्ती करणे, खत वितरणावर नियंत्रण ठेवणे, पोलीस केसेस दाखल करणे, न्यायालयात खटला दाखल करणे इत्यादी अधिकार प्राप्त आहेत. या प्रकरणी कृषी अधिकारी नाथराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून निटुर व खडक उमरगा शिवारात अवैधरित्या खत व रसायनिक विक्री करणाऱ्या चाकुर तालुक्यातील डोंग्रज येथील टेम्पो वाहन चालक मोहसीन धुलेसाब मुंजेवार, शिरूर तालुक्यातील आरी येथील आयशर वाहन चालक विशाल हणमंत आरीकर तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे कुमठे येथील कंपनी प्रतिनिधी सज्जन सुर्यकांत गावडे यांच्याविरुद्ध शिरूर अनंतपाळ अंतर्गत दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 4, 5, 7, 8, 19 C (iii) कलम 8 (3) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 (2) (A) (D) व भारतीय न्याय संहिता कलम 318, 3 (5) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!