उड्डाणपूल बनला मौत का कुवा
उड्डाणपूल बनला मौत का कुवा
उदगीर (प्रतिनिधी) : विकासाच्या टप्प्यात असलेल्या उदगीर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, उदगीर शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्देशाने तथकालीन आमदार स्व. चंद्रशेखर भोसले आणि तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीर शहराच्या लातूर आणि बिदर रस्त्यावर उड्डाणपूलांची निर्मिती केली. विकास कामाची गती वाढली होती, मात्र त्या विकास कामाला निकृष्ट कामाची झालर लागलेली असल्यामुळे या कामाची वेळोवेळी डागडूजी करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम खात्यावर आलेली आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी बिदर रस्त्यावरील उड्डाणपुलाला पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात पडल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तो खड्डा बुजवला, आता पुन्हा त्याच उड्डाण पुलावर दुसरा एक खड्डा रस्त्याच्या मधोमध पडला आहे. या खड्ड्याला फुलाचे हार वाहून काही संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. तर काही स्वयंसेवी संघटनांनी अपघात होऊ नये, म्हणून सामाजिक जाणिमा जपत या खड्ड्याच्या आजूबाजूला मोठमोठे दगड ठेवले आहेत. मात्र या गोष्टीचे गांभीर्य सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी कळेल? याची चर्चा आता उदगीर शहरात आणि परिसरात चालू आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तात्काळ हा खड्डा बुजवावा. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
