शोषित, वंचिताचे जगणे प्रकाशमान करणारे ‘आनंदाचे चांदणे’ – डॉ. सोमनाथ कदम
शोषित, वंचिताचे जगणे प्रकाशमान करणारे 'आनंदाचे चांदणे' - डॉ. सोमनाथ कदम
उदगीर (एल पी उगिले) : माणसांच्या भावभावना, अवतीभवतींचे वैविध्य आणि निसर्गाचे अविष्कार या बरोबरच आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, मानवतेचा अभाव प्रकटतेने दिसत आहे. या मागच्या कारणांचा विचार करता असे जाणवते की, महामानवांच्या मौलिक विचारांचे विस्मरण, बालवयातील हिंसक वर्तन यामुळे शोषित वंचिताचे जगणे खूपच भयानक होत चालले आहे. अशा परिस्थितीत शोषित वंचिताचे जगणे प्रकाशमान करण्यासाठी ‘ आनंदाचे चांदणे, ही साहित्यकृती निश्चितच प्रेरणादायी ठरेल. असे मत मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नव्या पिढीतील लेखक डॉ. सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भागवत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘चला कवितेच्या बनात, अंतर्गत च्या ३३८ व्या वाचक संवाद मध्ये लसाकमचे राज्य कार्याध्यक्ष तथा कणकवली कॉलेज येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी सुचिता गायकवाड लिखित ‘ आनंदाचे चांदणे, या साहित्यकृतीवर सुंदर असा संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लेखिका प्रा. सुचिता गायकवाड यांनी ४० वैविध्यपूर्ण लेखांच्या माध्यमातून समाज अनुभूतीतून व महामानवांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांचे जगणे उलगडून दाखवले आहे. शिक्षकी मनाला समाज घडवण्यासाठी आनंदी क्षण वाटायचे असून त्यासाठी सर्वांचा सहभाग आणि सर्वांच्या सह जीवनातून आनंदी जगणे घडवायचे आहे. परिस्थितीशी लढा देत असताना आलेली अनुभूती, त्यातून प्रकट झालेले विचार, मोडलेले संसार, उध्वस्त झालेले कुटुंब त्याचबरोबर वाढत चाललेला जातीय, धार्मिक उन्माद या सर्वांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या साहित्यकृतीच्या माध्यमातून केलेला आहे. माणसांचे मन आणि मेंदू घडवण्यासाठी वाचक संवाद सारख्या चळवळीची आज अत्यंत आवश्यकता असून या माध्यमातून खूप मोठे मौलिक कार्य घडत असल्याचेही ते म्हणाले.
शासकीय दूध डेरी च्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांना जन्मदिना निमित्त ग्रंथ भेट देण्यात आली. अध्यक्षीय समारोप करताना भगवत जाधव म्हणाले, लेखिकेने सर्व विषयावर प्रकाश टाकत सामाजिकते ची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आनंदाचे चांदणेच्या माध्यमातून केलेले असून त्याचे सुंदर विवेचन डॉ. कदम यांनी केले आहे.
नाट्यलेखक तुळशीदास बिरादार यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात संवादकांचा परिचय संयोजक अनंत कदम यांनी करून दिला तर आभार प्रा. राजपाल पाटील यांनी मानले.
