जामिनावर सुटल्यावर पुन्हा दहशतिचा प्रयत्न, पाठलाग करत पो.नि.चिंचोलकरांनी झाडली गोळी
जामिनावर सुटल्यावर पुन्हा दहशतिचा प्रयत्न, पाठलाग करत पो.नि.चिंचोलकरांनी झाडली गोळी
नांदेड (प्रतिनिधी) : मोक्कांतर्गत कारागृहात स्थानबद्ध असलेल्या विष्णुपुरी येथील सराईत गुन्हेगार प्रभाकर शंकरराव हंबर्डे याने जामिनावर बाहेर येताच, आपल्या मित्राचा १८ मे रोजी खंजरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणात ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना ३ जून रोजी तो विष्णुपुरी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. नांदेड ग्रामीण पोलीस आपल्या मार्गावर असल्याची माहिती मिळताच, त्याने दुचाकीवर पांगरी शिवाराकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला असताना त्याने पांगरी शिवारातील कॅनॉल रोडवर दुचाकी फेकून तो जंगलात पळाला. पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला असता प्रभाकर हंबर्डे याने शेवटी पोलिसावर पिस्तूल रोखले. पिस्तूल रोखताच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या कमरेखाली गोळी झाडली आणि तो जागीच कोसळला. हा थरार पांगरी शिवारात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला.
