मैत्रीच्या जगतातील परीस : संपादक गणेश होळे

0
मैत्रीच्या जगतातील परीस : संपादक गणेश होळे

मानवी जीवनात प्रत्येक जण आपापल्या विकासासाठी धडपडताना दिसतो. मात्र काही जण त्याला अपवाद ही असतात. आपला विकास होत असताना आपल्या सोबतच आपल्या मित्रांचाही विकास व्हावा, त्यांना देखील आर्थिक पाठबळ मिळावे. अशा उदात्य हेतूने फार कमी लोक प्रयत्न करत असतात. विशेषत: मित्रांच्या विकासासाठी धडपडणारे एकमेव नाव म्हणजे संपादक गणेश डी. होळे यांचे घेता येईल.
अत्यंत संयमी, शांत स्वभाव, मैत्रीची जाण असलेला माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येईल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराकडून झालेला शुभेच्छांचा वर्षाव, सत्कार आणि विविध सामाजिक उपक्रम हे पाहिल्यास त्या माणसाचे वेगळेपण निश्चितच जाणवू लागते. एक तपाहून अधिक काळापासून अतिशय धाडसी, स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक लिखाणाची शैली असलेले संपादक म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहेत. लातूर येथील आवृत्तीनंतर नांदेड, मुंबई, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज च्या आवृत्ती सुरू झाल्या आहेत. हा वाढलेला वटवृक्षासारखा पसारा ते अत्यंत प्रेमाने वाढवत आहेत.
त्यांच्या पत्रकारितेची दखल महाराष्ट्राने घेतली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.आदर्श पत्रकारितेचा मानदंड जपत तब्बल गेल्या 14 वर्षापासून पोलीस फ्लॅश न्यूज हे साप्ताहिक ते चालवत आहेत. त्यासोबतच साप्ताहिक पोलीस संदेश रिपोर्टर, पोलीस फ्लॅश न्यूज वेब पोर्टल, पोलीस फ्लॅश न्यूज यूट्यूब चैनल अशा माध्यमांचा पसारा देखील त्यांनी वाढवलेला आहे. काळाच्या ओघात राहुल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काम केले पाहिजे या भूमिकेतून ते काम करू लागले आहेत. मुख्य संपादक म्हणून अत्यंत दक्ष राहून ते जबाबदारी पार पाडतात.
लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणीवरही ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र पातळीवर दर्पण मराठी पत्रकार संघाची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी राज्यभर पत्रकारांसाठी लढा देणारी संघटना उभी केली. पत्रकारितेमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण करत प्रगतीचा आलेख चढता ठेवला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळेच उत्कृष्ट संपादक म्हणून संपादक रत्न, आदर्श पत्रकार म्हणून त्यांना वेळोवेळी गौरविण्यात आलेले आहे. राज्य पातळीवरचे ही पुरस्कार त्यांना अनेक वेळा मिळालेले आहेत. उत्कृष्ट दिवाळी अंकाचे तर त्यांनी रेकॉर्ड केले आहे. रोखठोक आणि निर्भीड पत्रकारिता करत असल्यामुळे काही अधिकारी, कर्मचारी त्यांच्यावर नाराज ही असतात. मात्र सत्याची कास धरून लिखाण करत असल्यामुळे वाचक वर्ग त्यांच्यावर जाम खुश असतो. एका तपामध्ये अर्थात 14 वर्षाच्या काळात त्यांना जवळपास 35 पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांचीही पत्रकारिता नवीन पत्रकारितेत येणाऱ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि आदर्श अशी आहे.
2022 मध्ये त्यांच्या आदर्श आणि रोखठोक पत्रकारितेची दखल घेत “झी 24 तास “ने देखील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा विकास महाराष्ट्राचा आवाज लातूरचा या कार्यक्रमांतर्गत पत्रकारिता क्षेत्रातून आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. पत्रकारितेचे उल्लेखनीय काम करत असतानाच या माध्यमातून सामाजिक जाणिवा जपण्याचे काम देखील गणेश होळे मोठ्या प्रमाणात करत आहेत. समाजातील गरजू लोकांना अर्थसाह्य करत असतानाच कित्येक गोरगरिबांचे संसार उभे करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात संसार उपयोगी साहित्य वाटप करणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, गरिब आणि प्रामाणिक लोकांना संसार उपयोगी साहित्य सोबतच अन्नधान्याचे कीट पुरवठा करणे, असे अनेक उपक्रम ते सतत राबवत असतात.
पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना पत्रकारितेचा विकास तर झालाच पाहिजे, सोबत पत्रकारांची मोठी फळी उभा राहिला पाहिजे. या उद्देशाने त्यांनी पोलीस फ्लॅश न्यूज चे जाळे महाराष्ट्रभर विणायला सुरुवात केली आहे. लातूर सारख्या एका टोकाच्या जिल्ह्यातून महाराष्ट्रभर आवृत्ती सुरू करणे मोठे जीकीरीचे आणि कष्टाचे आहे. मात्र सतत कामात राहण्यात ज्यांना आनंद असतो, ते असे काही करून जातात. मराठवाड्यामध्ये गुन्हेगारी जगताचा मागवा घेणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये पोलीस फ्लॅश न्यूजने अव्वल दर्जा ठेवला आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. गुन्हेगारी जगताच्या लेखना सोबतच सामाजिक जाणीवा जपत सडेतोड संपादकिय लेखामुळे देखील पोलीस फ्लॅश न्यूज साप्ताहिकाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मध्यंतरी दोन वर्ष कोरोना काळामध्ये वृत्तपत्र श्रेष्ठी मोठ्या अडचणीत सापडली होती. तशाही परिस्थितीत न डगमगता किंवा आपला कर्मचारी वर्ग कमी न करता, वाचकापर्यंत पीडीएफ च्या माध्यमातून अंक पोहोचता करणे, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत. मोठ-मोठी वृत्तपत्र आपला कर्मचारी वर्ग कमी करत होता, तशाही परिस्थितीत पोलीस फ्लॅश न्यूज वृत्तपत्र समूहाने आपल्या सर्व आवृत्तीच्या प्रतिनिधींना मदतीचा हात दिला. हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
वाचक वर्ग आणि हितचिंतकांच्या बळावर साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज आणि पोलीस संदेश रिपोर्टर ही वृत्तपत्र आपला वेगळा ठसा उमटवत गणेश होळे यांनी विकसित केली आहेत.
एक पत्रकार आणि एक सामाजिक जाणीव जपणारा कार्यकर्ता अशी दुहेरी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. तसे ते आर्थिक दृष्ट्या फार श्रीमंत नाहीत, मात्र त्यांच्या मनाची श्रीमंती कित्येक श्रीमंतांनाही लाजवेल इतकी मोठी आहे. कारण मदतीचा ओघ त्यांच्याकडून सतत चालू असतो. इतरांना मदत करणे हा आपला स्थायी स्वभाव आहे. असे समजून ते काम करत असतात, आणि या पद्धतीने मदत करत असताना जात, धर्म, पंथ, गट, तट, राजकीय पक्ष असे कोणतेही भेदभाव न बाळगता त्यांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले आहे. “गोरगरिबांना साथ, भ्रष्ट प्रवृत्तींना लाथ “अशा पद्धतीच्या ब्रीद वाक्याला घेऊन धडाडीने निर्भीड पत्रकारिता ते करतात. हे करत असताना कित्येक वेळा संघर्ष करत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. मोठे अधिकारी नाराज झाले म्हणून हताश न होता, कर्मचाऱ्यांसाठी लढा देणे ही त्यांची सतत भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या या स्वभावा मुळे काही लोकांची नाराज ही ते ओढवून घेतात. त्यामुळेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या संपादक रत्न, आदर्श संपादक, निर्भीड पत्रकार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मैत्रीचा धागा जपत ते आपला मित्र परिवार सतत वाढवत आहेत. आपल्यामुळे इतरांनाही मदत झाली पाहिजे. या भूमिकेमुळे त्यांना मैत्रीचा परिस असेही म्हटले जाते. कारण त्यांच्या परिसस्पर्शाने अनेकांचे कल्याण झाले आहे, होत आहे, भविष्यातही होत राहील. यात तिळमात्र शंका नाही.
अत्यंत धाडसाने आणि हिमतीने पत्रकारितेत रोखठोक विचार मांडणारे संपादक गणेश होळे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
त्यांना समाजकार्य करण्यासाठी, सामाजिक जाणीव जपण्यासाठी,
आई जगदंबा त्यांना आरोग्य संपन्न उदंड आयुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

ॲड. एल पी उगिले,
उदगीर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!