3 लाख 49 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 1 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल.
लातूर (एल पी उगिले) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना एक आरोपी सह तीन लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ही धडक कारवाई ठरली आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी “अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान-2” संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 12/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी एक इसम प्रतिबंधित गुटखा किरायाच्या रूममध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 12/06/2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील जाफर नगर भागातील एका घरावर छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 3 लाख 49 हजार 420 रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक व विक्री करीत असताना मिळून आलेला इसम नामे जखियोदिन रफीयोदिन सय्यद, (वय 48 वर्ष, राहणार केशवराज शाळेजवळ, रियाज कॉलनी लातूर) याचे विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले,पोलीस अंमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, युवराज गिरी, मुन्ना मदने, गोविंद भोसले, विनोद चलवाड ,बंडू नीटुरे यांनी केली आहे.
