यशाचे मुल्यांकन निर्धारावर अवलंबून असते – सोमय मुंडे
यशाचे मुल्यांकन निर्धारावर अवलंबून असते - सोमय मुंडे
उदगीर (प्रतिनिधी) : कोणतेही यश अथवा अपयश अंतिम नसते.यशाचं मुल्याकंन आपल्या मनातील निर्धारावर अवलंबून असते.असे उद्गार
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त लाल बहादूर शास्त्री शैक्षणिक संकुल उदगीर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुणवंतांना संबोधित करतांना काढले.
लाल बहादुर शास्त्री शैक्षणिक संकुलाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत तसेच विविध शालेय व अन्य स्पर्धेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थांचा तसेच उपक्रमशील पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार सोहळा उदगीर येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला.
सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, शल्यचिकित्सक डॉ.विनायक मुंडे, शिलाताई आलूरकर, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, कार्यवाह शंकरराव लासुणे,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे ,डॉ. प्रकाश येरमे, शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे , व्यंकटराव गुरमे, प्रशांत राजूरकर,अंजलीताई नळगीरकर, चंद्रकांत धनबा, मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक अंकुशराव मिरगुडे, प्राचार्य श्रीपाद सिमंतकर उपस्थित होते.
याप्रसंगी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के गुण घेतलेल्या व नव्वद टक्केच्या वर गुण प्राप्त केलेल्या अठ्यान्नव विद्यार्थांचा,एन एम एस परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी,इंडियन ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षेत गोल्ड मेडल व स्काॅलरशीप प्राप्त,संसद स्कूल संसद स्पर्धेत तृतीय क्रमांक व पंतप्रधान पद मिळवणारी अक्षरा दुरूगकर,वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात बक्षीसप्राप्त ,निबंध स्पर्धा, संस्कृती संवर्धन स्पर्धत व एन सी.सी बेस्ट कॅडेट उपक्रमात बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शंभर शिक्षक क्लब जालन्यातील संस्थेचा पुरस्कार प्राप्त करणारे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित झालेल्या नीता मोरे, दहावी विभाग प्रमुख रामेश्वर मलशेट्टे, सहप्रमुख श्रद्धा पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ,यशस्वी विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.परंतु यश कायम टिकवायचे असेल तर आपल्या प्रयत्नात सातत्य असणे गरजेचे आहे. कोणतेही यश एका रात्रीतून मिळत नसते.यशासाठी मनाचा निर्धार पक्का असावा लागतो. तोच माणूस यशस्वी होऊ शकतो की जो रोजचा दिवस जिंकतो. जीवनात आलेलं अपयश मोठ्या ताकदीने पचवणारी माणसचं भविष्यात कर्तृत्ववान होऊ शकतात. म्हणून यशाबरोबरच आपण अपयश पचवायला शिकले पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी एक दिवसही वाया न घालवता तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे तरच यश हे तुमच्या पुढ्यात उभं राहू शकते.असा मौलिक सल्ला दिला.
देगलूरचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक व सोमेय मुंडे यांचे वडील डॉ. विनायक मुंडे यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था गुणवत्तेचे शिखर पादाक्रांत करीत असल्याचा आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तर अध्यक्षीय समारोपात डॉ. सुरेंद्र आलूरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे नियोजन करून त्यात सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या यशाबरोबरच पालक व शिक्षकांचेही कष्ट महत्वपूर्ण ठरतात, आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून संस्थेचा नावलौकिक वाढतो. ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असून विद्यार्थ्यांनी समाजासाठी, राष्ट्रासाठी सामाजिक भान जपलं पाहिजे. असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पडलवार, प्रीती शेंडे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर यांनी मानले.
