तालुक्यात नालासरळीकरण व बंधारे दुरुस्ती कामाच्या चौकशीसाठी मंगेश सुर्यवंशी यांचे आंदोलन
तालुक्यात नालासरळीकरण व बंधारे दुरुस्ती कामाच्या चौकशीसाठी मंगेश सुर्यवंशी यांचे आंदोलन
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यात नालासरळीकरण व बंदारे दुरुस्तीची कामे मोठ्याप्रमाणात करण्यात आली आहेत. या कामात अनियमिता, बोगस, निकृष्ठ व अर्धवट कामे करण्यात आली आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश सुर्यवंशी लोकशाही मार्गाने दि. १८ जुन पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत.
उदगीर तालुक्यात मागील वर्षभरात नालासरळीकरण व बंदारे दुरुस्तीची कामे करण्यात आली. या कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार, अनियमिता, निकृष्ठ कामे व बरीच कामे अर्धवट झाला असून याकडे अधिकारी पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत आहेत. वेळोवेळी तक्रार करुन देखील चुकीच्या कामाला अभय देण्याचे काम मृदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी करीत आहेत असा आरोप मंगेश सूर्यवंशी यांनी केला आहे.
निकृष्ठ व बोगस कामाच्या विरोधात तक्रारी करुन देखील गुत्तेदारास मदत व्हावी व चुकीची कामे पुढे येवू नयेत यासाठी उपविभागीय अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग हे तक्रारकर्त्यास चुकीची माहिती देत आहेत व आमच्या विभागात कामेच झाली नसल्याचे सांगतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मंगेश सुर्यवंशी हे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने विविध आंदोलन केले जाईल. अशी माहिती सुर्यवंशी यांनी दिली आहे.
