अहमदपूर- नांदेड बाह्य वळण रस्त्यावर पुन्हा अपघात: सुदैवाने जीवितहानी नाही
अहमदपूर- नांदेड बाह्य वळण रस्त्यावर पुन्हा अपघात: सुदैवाने जीवितहानी नाही
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरातील मरशिवणी जवळील अहमदपूर -नांदेड ३६१ राष्ट्रीय महामार्ग बाह्य वळण रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच असून, दि १३ जुलै रोजी दुपारी एक बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि १३ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता च्या सुमारास अहमदपूर शहराबाहेरील ३६१ राष्ट्रीय महामार्ग अहमदपूर -नांदेड बाह्य वळण रस्त्यावर मरशिवणी जवळ हा अपघात घडला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्र. MH XX XXXX नांदेड कडून राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रोडवरून अहमदपूरच्या दिशेने येत असताना,लातुर कडून नांदेडकडे समोरून येणाऱ्या कार क्रमांक MH XX YYYY सोबत तिची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचे किरकोळ नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने, या अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. किरकोळ दुखापत झालेल्या काही व्यक्तींना प्राथमिक उपचार देण्यात आले.
अहमदपूरच्या बाह्य वळण रस्त्यावर गेल्या अनेक महीण्यापासुन अनेक अपघात झाले असुन अपघातात अनेक जण मरण पावले आहेत या वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या रस्त्यावर वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन काटेकोरपणे केले जावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात जाणारा महामार्गावरून असलेला वळण रस्ता या ठिकाणी सर्व वाहनचालकांनी समोरून किंवा आजूबाजूने येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेऊन आपले वाहन चालवावे. वळण रस्त्यावरून अपघात होण्याच्या बराच वेळेला घटना घडत आहेत. अशा ठिकाणी सावधगिरी बाळगली तर बरेच अपघात टळतील.
भरत केदासे, वाहतूक निरीक्षक, अहमदपूर.
राष्ट्रीय महामार्गावर सर्वच वाहनांच्या वाढत्या गती आहेत. वाहनाच्या गतीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सर्व वाहन चालक आणि वाहने चालवताना सावधगिरी बाळगली तर अपघात कमी प्रमाणात होतील. विशेषतः युवक वर्गाची वाहन चालवत असताना अधिक गती दिसत असून त्यावर नियंत्रण ठेवावे
अश्वजीत जानराव, विभाग नियंत्रक, लातूर.
