राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या प्रदेश संघटन महामंत्री पदी डॉ. शरदकुमार तेलगाने यांची निवड
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील ख्यातनाम असलेल्या ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम चे प्रमुख संचालक तथा राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असलेले डॉ. शरदकुमार तेलगाने यांच्या एकूण कामकाजाची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्याच्या संघटक महामंत्री पदी निवड करण्यात आली आहे.
डॉ. शरदकुमार तेलगाने हे सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करतात. एक प्रबोधनात्मक कीर्तनकार म्हणूनही ग्रामीण भागामध्ये ते लोकप्रिय आहेत. ह भ प डॉ. शरद कुमार तेलगाने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी करण्यात आली होती. त्यांच्या एकूण कामकाजाची गती आणि विस्तार पाहून एक उच्चविद्याविभूषित आणि प्रचंड जनसंपर्क असलेल्या व्यक्तीला व्यापक स्वरूपाचे काम द्यावे, असा विचार करून राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे महामंत्री बालाजी नारायण सूर्यवंशी आणि किशोरजी लखन यांनी उदगीर येथे प्रत्यक्ष भेट देऊन डॉ. शरदकुमार तेलगाने करत असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या एकूण कामकाजाचा लेखाजोखा पाहून त्यांना प्रदेश संघटक महामंत्री या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती खऱ्या लाभार्थ्यापर्यंत गेली पाहिजे, तसेच या योजनेपासून कोणीही लाभार्थी वंचित राहू नये. या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे, आणि ते काम डॉ. शरदकुमार तेलगाणे यांच्या सोबत चे कार्यकर्ते करत आहेत. हे चित्र पाहून राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निवड प्रक्रियेच्या वेळी केंद्रीय कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार उदगीर तालुका राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या वतीने करण्यात आला.
डॉ. शरदकुमार तेलगाने यांना त्यांच्या कार्याची व्यापकता पाहून केंद्रीय कार्यकारिणीने बढती दिली आहे. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे हे पुण्याचे आणि समाज हिताचे कार्य आहे. मी आध्यात्मिक क्षेत्रात वावरत असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, हे देखील एका अर्थाने अध्यात्मिक क्षेत्रातील कामच आहे. गरजूंना योग्य पद्धतीची मदत शासकीय पातळीवरून केली जाते, परंतु केवळ अज्ञानामुळे ती मदत त्यांना मिळत नसेल तर आपले कार्यकर्ते त्यांना ती मदत मिळवून देतील. असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या वेळी कर्नाटक राज्यातील सुरजीत आडे जिल्हा अध्यक्ष बिदर तसेच तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन काळगापुरे, तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा शंकर तेलंगपुरे, तालुकाध्यक्ष किसान मोर्चा भरत बिरादार, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष धनाजी बिरादार, शिक्षक आघाडी महारूद्र झेरकुंटे , देवणी तालुकाध्यक्ष साईनाथ निलावार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे शहराध्यक्ष निलेश हिपळगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

