उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांचे नागरिकांना महसूल सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन !अहमदपूरच्या उपविभागीय कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा

0

अहमदपूर ( गोविंद काळे ) महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, अहमदपूर येथील उपविभागीय कार्यालयात महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी नागरिकांना महसूल विभागाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. महसूल सप्ताहात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी दि ०१ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्य मंत्री बाळासाहेब जाधव, एल.आय. सी चे विकास अधिकारी तथा साहित्यिक मोहीब कादरी, तहसीलदार उज्वला पांगरकर, तहसीलदार नरसिंग जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपजिल्हाधिकारी गाठाळ म्हणाल्या की, “महसूल विभाग हा शासनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे रेकॉर्ड, कर संकलन आणि विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी यांसारख्या कामांमध्ये महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. नागरिकांना या कामांची माहिती व्हावी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.”
यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी आणि महसूल विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महसूल सप्ताहा दरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार उज्वला पांगरकर सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार तलाठी अविनाश पवार यांनी मांनले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!