भारतीय ज्ञान परंपरेतून शाश्वत मूल्यांची शिकवण दिली जाते – डॉ. व्ही. डी. गायकवाड

0

उदगीर : (प्रतिनिधी) अनेक महापुरुषांच्या त्याग आणि बलिदानातून भारत हे राष्ट्र निर्माण झाले आहे. भारत हा सर्वात तरुण देश असून चारित्र्यसंपन्न, राष्ट्रभक्त, सामाजिक बांधिलकी जोपासणारे तरुण निर्माण करण्याकडे शिक्षण व्यवस्थामधून अधिक लक्ष दिले जात आहे. भारतीय ज्ञानपरंपरा ही अनेक शाश्वत मूल्यांची शिकवण देते, असे मत छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय, उदगीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. गायकवाड यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतीय ज्ञानपरंपरेतील तत्त्वज्ञान व ॲडव्हान्स लर्नर पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. एम. सूर्यवंशी हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. भालचंद्र करंडे, डॉ. गौरव जेवळीकर यांची विशेष उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, मानवता, नैतिकता, प्रामाणिकपणा, प्रेम यासारख्या मूल्यांची शिकवण भारतीय ज्ञानपरंपरेतून प्राप्त होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी व चांगले नागरिक निर्माण करण्यासाठी अशा विद्वत व्याख्यानाची आवश्यकता असते, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले, विविध विद्याशाखातून भारतीय ज्ञानपरंपरा हा पेपर अनिवार्य करून सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. विज्ञानवादी व विवेकवादी पिढी निर्माण करण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. याच कार्यक्रमादरम्यान ॲडव्हान्स लर्नर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सय्यदा सफिया, इफात निंदा, स्नेहा घोनशेट्टे, सय्यदा निशांत या गुणी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वामी शुभदा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आर. एम. मुदुडगे, डॉ. के. आर. गव्हाणे यांनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!