कर्जाला कंटाळून गोताळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे): कर्जाला कंटाळून अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साहेबराव बळीराम जगताप असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहेबराव जगताप यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती होती. त्यांच्यावर लातूर जिल्हा सहकारी बँकेचे ७०,००० रुपये आणि उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे ७ लाख रुपये (कॅश क्रेडिट) असे एकूण कर्ज होते. त्यांनी उस्मानाबाद बँकेचे ३ लाख रुपये परतफेड केले होते. असे गोताळा गावात सांगण्यात येत आहे मात्र, वाढते कर्ज आणि त्यातच सततची नापिकी यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते.
मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. साहेबराव यांच्या पश्चात दोन मुले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दीपक जगताप यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अहवाल क्रमांक ५०/२०२५, कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत या घटनेची नोंद केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी साहेबराव जगताप यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बि.डी भुसनूर यांच्या आदेशानुसार सहायक फौजदार चिमणदरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
