विद्यार्थीदशेतील वेळेचे नियोजन भविष्य घडवू शकते- दीपक कांबळे

0

उदगीर : (प्रतिनिधी) पदवीचा मूळ उद्देश केवळ अर्थार्जण हा नसून वैविध्यपूर्ण ज्ञान संपादन करणे हा असतो, सर्व विद्याशाखा ज्ञानदानाचेच काम करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी स्वक्षमता व मर्यादा ओळखाव्यात. असे मत दीपक कांबळे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राच्या वतीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व करिअरच्या संधी’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘प्रश्न तुमचे, उत्तर आमचे’ या विशेष व्याख्यानादरम्यान बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बी. डी. करंडे, डॉ. बी. एस. होकरणे, डॉ. आर. बी. आलापुरे, डॉ. जी. जी. जेवळीकर, प्रा. पी. पी. वाघमारे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना दीपक कांबळे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड दूर करून इतरांबरोबरच्या तुलनेपासून दूर राहणे आवश्यक आहे. ‘स्व’ची ओळख न झाल्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो. वेळेचे योग्य नियोजन करून आयुष्यात यशस्वी होता येते, असा मूलमंत्र उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. हल्लाळे म्हणाले, प्रतिकूलता ही संघर्ष करण्यासाठी व पुढे जाण्यासाठी बळच देत असते. त्यामुळे परिस्थितीला दोष न देता परिस्थिती बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘व्यक्तिमत्व विकास व करिअरच्या संधी’ या अनुषंगाने अनेक प्रश्न विचारले व त्याला दीपक कांबळे यांनी सोदाहरण उत्तरे दिली. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. पी. पी. वाघमारे यांनी तर आभार डॉ. आर. बी. आलापुरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!