सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये समावेश
अहमदपूर( गोविंद काळे ) मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू असलेल्या विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, या उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील असतील. ही समिती मराठा आरक्षणाशी संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींवर समन्वय साधेल, तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या विशेष वकिलांशी समन्वय साधण्याचे काम करेल.
चौकट : –
समितीतील सदस्य:
जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (अध्यक्ष)
उच्च शिक्षण तंत्रद्यान मंत्री चंद्रकांत पाटील (सदस्य)
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (सदस्य)
शालीय शिक्षण मंत्री दादा भुसे (सदस्य)
उद्योग मंत्री उदय सामंत (सदस्य)
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (सदस्य)
माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (सदस्य)
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सदस्य)
क्रिडा मंत्री माणिक कोकाटे (सदस्य)
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) (सदस्य)
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (सदस्य)
सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (सदस्य सचिव)
या समितीमध्ये बाबासाहेब पाटील यांचा समावेश झाल्यामुळे मराठा समाजाच्या हितासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार क्षेत्रातूनही अधिक बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या निवडीबद्दल ना. बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच, या जबाबदारीचा उपयोग राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अहमदपूर मतदारसंघातील जनतेमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
