पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार सराईत गुन्हेगार ऋषिकेश हंगे लातूर जिल्ह्यातून हद्दपार

0

​ लातूर (प्रतिनिधि): गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यांच्या आदेशानुसार, अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ बंटी बालाजी हंगे याला एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
​याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ऋषिकेश हंगे याच्यावर सन 2018 ते 2025 या काळात मारामारी करणे, धमकी देणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो किरकोळ कारणांवरून लोकांशी वाद घालून परिसरात दहशत निर्माण करत असल्यामुळे त्याच्या वर्तनामुळे आगामी काळात गणेशोत्सव, इतर सण, उत्सव किंवा निवडणुकांमध्ये शांतता भंग होण्याची शक्यता होती.
​पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांना या गुन्हेगाराविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, अहमदपूर डॉ. मंजुषा लटपटे यांच्याकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आदेश दिले होते.
​अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांनी हा सविस्तर प्रस्ताव तयार केला. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर आरोपीला मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(ब) अन्वये एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
​या कारवाईमुळे आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव आणि निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा निर्धार स्पष्ट झाला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!