विद्यार्थी व गुरुजींनी बुजवला जीवघेणा खड्डा
हा खड्डा मौत का कुंआ झाला होता
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकूर कोपरा रोडवरील झरी गावापासून एक किलोमीटर अंतरावर जीवघेणा खड्डा पडला होता या खड्ड्यामुळे अनेक लोक जखमी झाले. अनेकांना कायमचे अपंगत्व आले,तो खड्डा येथील सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी बुजवल्याने परिसरातील लोकांनी कौतुक केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चाकूर तालुक्यातील झरी बु. हे गाव भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते या गावाला अहमदपूर आंबेजोगाई हायवे व लातूर नांदेड जोडणारा हायवे कोपरा चाकूर रस्ता आहे. दोन हायवेला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्याने लोकांची वर्दळही जास्त आहे परंतु हा रस्ता झाला तेव्हापासून प्रत्येक वेळी इथे खड्डा पडतो यापूर्वीही तो बुजविण्याचा प्रयत्न झालाय परंतु बांधकाम विभाग मात्र याकडे साफ दुर्लक्ष करते. अजून किती लोकांना अपंगत्व पत्करावे लागेल माहिती नाही मागच्याच आठवड्यात दोन पती-पत्नी रस्त्याने जात असताना दोघही जागेवरच पडल्याने पत्नीच्या डोक्याला खूप मार लागला व रक्तबंबाळ झाली.असे नित्याचेच बनले होते झरी बु येथील सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रख्यात निवेदक प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. आपण एक सामाजिक काम करूया नुसतं प्रबोधन ऐकून किंवा प्रबोधन सांगून काही प्रश्न मिटत नसतात प्रश्न मिटविण्यासाठी आपण प्रत्यक्षात उतरावे लागते हे सांगताच येथील विद्यार्थ्यांनी होकार देत तो खड्डा बुजविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हा खड्डा बुजवण्यासाठी सहशिक्षक आत्माराम बाबुराव गुट्टे,खंदारे राजकुमार रमेश, किरणकुमार बंकटराव काळे, सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी रुपेश धुंडिराज येन्ने,दत्ता व्यंकटी पुरी,उदगीरे रामचंद्र अशोक,सिद्धेश्वर तुकाराम शिंदे या सर्वांनी मिळून या जीवघेण्या खड्ड्यात मोठ मोठे दगड टाकून त्यावर छोटे दगड टाकून माती व मुरूम टाकून तो खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला.
आपण आपल्या अंगणात दारात एकही खड्डा ठेवत नाही आपण आपल्या स्वतःच्या घराची व दाराची जशी काळजी घेतो तसे सभोवताली परिसरातील आपल्याही रोडवरील असे खड्डे प्रत्येकानं बुजविण्याचा प्रयत्न केला तर अनेकांचे प्राण वाचतील आपल्या परिसरात असे अनेक जीवघेणे खड्डे असतात परंतु याकडे आपले साफ दुर्लक्ष असते तसे ते प्रशासनाचे व बांधकाम विभागाचे काम जरी असले तरी आपण आपल्या देशाचे नागरिक म्हणून आपले हि कुठेतरी कर्तव्य असते असं समजून जर काम केलं तर काम केल्याचा आनंद आणि इतरांचे प्राण वाचवले तर याचे पुण्य आणि समाधान मिळेल. लाखो रुपये कमावूनही हे समाधान मिळत नाही.
इतरांच्या आयुष्यातील दुःख कमी करणे हेच मानवाचे पहिले कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. एक खड्डा बुजवून हे काम जरी छोटी असले तरी या पासून मिळणारी प्रेरणा ही खूप मोठी आहे जसे प्रत्येकाने एक झाड लावले तर लाखो झाडं आपल्या परिसरात उभी राहू शकतात. तसे प्रत्येकानं काहीना काहीतरी काम केले तर आपला परिसर सुखी-समाधानी होऊ शकेल असेही प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी सांगितले.