मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने स्वातंत्र्यसैनिकांच्या सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने व युवासेना विस्तारक प्रा. सुरज दामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र जाधव भंडारवाडीकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र जाधव भंडारवाडीकर यांच्या लातूर शहरातील दीपज्योतीनगर परिसरातील निवासस्थानी जाऊन शिवाजीराव माने यांनी रामचंद्र जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पद्मिनी जाधव या उभयतांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, फेटा व विठ्ठल – रुक्मिणीची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन हृद्यसत्कार केला. यावेळी बँक कर्मचारी सेनेचे जिल्हा संघटक सी.के. मुरळीकर, शिरूर अनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे, व्यापारी आघाडीचे जिल्हा संघटक बसवराज मंगरुळे , मा. जिल्हा कार्यालय प्रमुख दिनेश बोरा, सोमनाथ स्वामी, कृष्णा जाधव, मुकेश माने, सुरज जाधव आदींसह जाधव परिवारातील सदस्य उपस्थित होते.
पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता. हैद्राबाद संस्थानांवर निजाम मीर उस्मान अलीखान, निजाम – उल – मुल्क, असफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या जुलमी राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला. या मुक्तिलढ्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तिसंग्राम सुरु झाला. या मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिक सामील झाले होते. त्यातील एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून रामचंद्र जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी गुलबर्गा कारागृहात शिक्षाही भोगली आहे. अशा संघर्षमय व्यक्तिमत्वाचा सत्कार शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आला. तसेच मुक्तिसंग्रामात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.