नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आमदारांसोबत उपजिल्हाप्रमुख दाने यांनी घेतली आ.धीरज देशमुख यांची भेट
रेणापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना स्थानिक आमदारांसोबत काम करण्यास तयार आहे, अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी आ.धीरज देशमुख यांना दिली. दाने यांनी आ.देशमुख यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. आ. देशमुख यांची प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल दाने यांनी यावेळी त्यांचा सत्कारही केला. यावेळी विविध गावांच्या समस्यांविषयी दोगांची चर्चा झाली. रेणापूर येथे स्व. विलासराव देशमुख व स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाची उभारणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मूलभूत सोयी सुविधा यासंदर्भात आ.देशमुख यांना निवेदन देण्यात आले. रेणापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या रस्त्या संबंधी अडचणी दूर कराव्यात. तालुक्याला सरसकट पीक विमा मिळावा,अतिवृष्टीने सोयाबीन,मूग,मका या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. रेणापूर, मोटेगाव, चाडगाव, मोरवड, भोकरंबा, सुमठाणा, तळणी, गोविंदनगर, कारेपूर येथील विकासकामे तात्काळ सुरू करावीत.प्रशासकीय बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घ्यावे,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे मत आ.देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी लातूर ग्रामीण तालुकाप्रमुख ॲड.प्रविण मगर, शिवसेनेचे कपिल चितपल्ले, गोविंदबापू सोमवंशी, भगवंत शिंदे, जयकुमार आदींची उपस्थिती होती.