सेंद्रिय शेती काळाची गरज – नाबदे

सेंद्रिय शेती काळाची गरज - नाबदे

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या बदलत्या काळाची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक शेती गरजेचे आहे. असे विचार उदगीर तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी व्यक्त केले. उदगीर तालुक्यातील शेकापुर येथे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी भालके आणि कृषी विभागाच्या वतीने आयोजित सेंद्रिय शेती विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी आफार्मचे लातूर विभाग प्रमुख रामेश्वर कलवले, यशवंत गायकवाड कृषी सहाय्यक,प्रशांत गायकवाड,कृषी सहाय्यक मुक्तांजली जामखंडे , सरपंच ज्ञानोबा कोनाळे, विजया प्रल्हाद सावंत, व्यंकटराव पाटील, जनार्दन सावंत, रामचंद्र सावंत,पद्माकर फुले,सुनिल देवनाळे,अमित हाळीघोंगडे,हणमंत म्हैत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी भालके यांनी केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेळोवेळी शासनाच्या योजना समजावून सांगणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

पुढे बोलताना कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी गांडूळ खत निर्मितीला प्राधान्य देऊन सेंद्रिय शेती करावी. शेती करत असताना अनावश्यक रासायनिक खताचा भडीमार करू नये. तसेच शेतकऱ्यांनी कृषिपूरक उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे. जसे की कुकुट पालन, मधुमक्षिका पालन, शेळीपालन, मच्छी पालन यासोबतच जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाला ही प्राधान्य द्यावे. ज्यामुळे आर्थिक स्वावलंबनकडे वळू शकेल. यासोबतच शेतकर्‍यांनी  पोखरा योजनेतून विविध उपक्रम राबवले जातात त्याची माहिती घेऊन शासनाच्या वतीने दिले जाणारे अर्थसाह्य ही शेतकऱ्यांनी मिळून घ्यावे. असे आवाहन केले.सुत्रसंचलन नितीन दुरूगकर यांनी तर आभार नरसिंग बुगडे यांनी मानले. याप्रसंगी शेकापुर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author