लातूर (एल पी उगीले)
दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केला असता, तर कदाचित आजचा दसरा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्याचे भाग्य एका २२ वर्षीय तरुणाला लाभले असते. मात्र, हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीत त्याला आपला जीव गमवावा लागला. कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हेल्मेटच्या महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलीस ठाणे कासार शिरशी हद्दीतील मौजे माडज येथील विजय बालगीर हा २२ वर्षीय तरुण काल उमरगा रोडने मोटारसायकलवरून प्रवास करत होता. यावेळी एकोजी मुदगड गावाजवळ त्याच्या मोटारसायकलची बैलगाडीला पाठीमागून धडक बसली. या अपघातात विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
डोक्याला हेल्मेटचे सुरक्षा कवच असते, तर या अपघातात त्याचे प्राण वाचण्याची शक्यता होती. विजयच्या कुटुंबीयांसाठी हा धक्का अत्यंत वेदनादायी असून, सणाच्या दिवशी घरातील तरुणाचा झालेला मृत्यू ही कधीही भरून न निघणारी हानी आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी सातत्याने जनजागृती केली जात आहे. नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगण्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. तरीदेखील अनेक दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय प्रवास करत असल्याचे दिसून येते. अशा निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे, तर अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे.
लातूर पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन
दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून, स्वतःचा जीव आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. अपघात सांगून होत नाही; मात्र हेल्मेटमुळे डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी होण्यास मदत होते.
त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दुचाकीवरून प्रवास करताना स्वतः हेल्मेट घालावे आणि मागे बसलेल्या सहप्रवाशालाही हेल्मेट घालण्यास सांगावे. काही मिनिटांच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य दुःखात जाऊ शकते, हे लक्षात ठेवावे.














Responses (0 )