लातूर (एल पी उगीले) ग्रामीण परिसरातील ममदापूर येथे शेतात सुरू असलेल्या बेकायदेशीर सुतळी बॉम्ब निर्मितीच्या ठिकाणी लातूर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले बॉम्ब आणि निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ममदापूर येथील चंद्रकांत धनवे यांच्या शेतातील रस्त्यालगत असलेल्या अंदाजे १५ बाय ५० फूट आकाराच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच शेडलगतच्या मोकळ्या जागेत सुतळी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले सुतळी बॉम्ब, सुतळी, कागद, सल्फर तसेच बॉम्ब निर्मितीसाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य आढळून आले. यावेळी सहा महिला कामगार आणि मुकादम लिंबराज गणपती मोरे (वय ४२, रा. ममदापूर, ता. लातूर ग्रामीण) उपस्थित होते.
प्राथमिक चौकशीत या कारखान्याचा मालक म्हणून आसिफ रसूल शेख (वय ३२, रा. ताजुद्दिन बाबा दर्गा रोड, आंबेडकर चौक, लातूर) यांचे नाव समोर आले आहे. सुतळी बॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक परवान्याबाबत चौकशी केली असता, संबंधितांकडे परवाना उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आवश्यक परवान्यांची पडताळणी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव; जीवितास धोका
स्फोटक पदार्थ हाताळण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, संरक्षक साधने आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना प्रथमदर्शनी अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, उपलब्ध साहित्याची मोजणी व जप्ती आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. स्फोटक पदार्थ अधिनियम, १८८४, स्फोटक पदार्थ नियम, २००८ तसेच तपासात निष्पन्न होणाऱ्या अन्य लागू कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने (चाकूर) यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण (चाकूर पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश कुलकर्णी (उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चाकूर), पोलीस कर्मचारी लक्ष्मण अरदवाड, गणेश वनामी तसेच महिला पोलीस कर्मचारी पूनम शेटे आणि रूपाली भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
परवान्याशिवाय स्फोटक पदार्थ किंवा फटाक्यांची निर्मिती, साठवणूक अथवा हाताळणी होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. अशा धोकादायक आणि बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.














Responses (0 )