लातूर (प्रतिनिधी)
दुचाकीस्वारांनी प्रत्येक प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर करावा, आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळता यावी, यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाला सामाजिक उपक्रमांची जोड देत पोलीस स्टेशन भादा हद्दीतील बिरवली येथील आई अंबाबाई नवरात्र महोत्सव समितीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या ५१ रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली जात आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याचे पटवून देण्यासाठी पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामध्ये अनेक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये रक्तदान करणाऱ्या नागरिकांना हेल्मेटचे वाटप करून रक्तदानातून जीवनदान आणि हेल्मेटच्या वापरातून जीविताचे संरक्षण हा संदेश देण्यात आला होता. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सवातही नवरात्र मंडळांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करावे, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत बिरवली येथील आई अंबाबाई नवरात्र महोत्सव समितीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात एकूण ५१ नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या सर्व ५१ रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासोबतच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक दुचाकी प्रवासात हेल्मेट वापरा!
दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली खबरदारी आहे. जवळचा प्रवास असो किंवा लांबचा, प्रत्येक वेळी दुचाकीस्वाराने तसेच मागे बसलेल्या व्यक्तीनेही योग्य हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, हेल्मेट वापराबाबत गांभीर्य बाळगून प्रत्येक प्रवासात हेल्मेटचा वापर करावा. तसेच सामाजिक बांधिलकी जपत नवरात्र मंडळांनी रक्तदान शिबिरे, हेल्मेट वाटप आणि जनजागृतीसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
“रक्तदानातून जीवनदान आणि हेल्मेटमधून जीविताचे संरक्षण” हा संदेश समाजात रुजवून रस्ते अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी नागरिकांनी आणि सामाजिक मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.














Responses (0 )