उदगीर (एल पी उगीले) वाचनामुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडते, विचारांना व्यापकता प्राप्त होते, आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करावे. असे उद्गार प्रमुख व्याख्याते डॉ. शुभम जाधव यांनी काढले. किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे होते. यावेळी मंचावर डॉ. अनंत टेकाळे , डॉ. संजय निटूरे यांची उपस्थिती होती .पुढे बोलताना डॉ. शुभम जाधव म्हणाले की, तरुण हे भारताचे भविष्य आहेत. भविष्याला प्रकाशमान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. पुस्तके ही केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून जीवन समृद्ध करणारी आणि योग्य दिशा दाखविणारी मार्गदर्शक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकांसोबतच वैचारिक, प्रेरणादायी आणि चरित्रात्मक साहित्याचेही नियमित वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. मांजरे यांनी ज्ञान, विचार आणि संस्कार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वाचनाची सवय महत्त्वाची असल्याचा संदेश दिला. वाचाल तर वाचाल त्यामुळे सर्वांनी वाचनाकडे वळावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार यांनी केले. त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या जीवनात ग्रंथालय आणि वाचनसंस्कृतीचे स्थान अधोरेखित केले.भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. स्वामी तेजस्विनी यांनी केले.














Responses (0 )